मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये गुरूवारी रात्री तीन पत्रकारांवर हल्ला झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या हल्ल्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. राघवेंद्र दुबे असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव असून ते मीरा-भाईंदरमधील एका साप्ताहिकाचे संपादक होते. शशी शर्मा आणि संतोष मिश्रा हे दोघे पत्रकार जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मिश्रा, शशी शर्मा आणि राघवेंद्र दुबे हे तीन पत्रकार गुरूवारी रात्री पोलिसांनी छापा मारलेल्या मीरारोड येथील बारचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी संतोष मिश्रा आणि शशी शर्मा यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या दोघांवर हल्ला केल्याची तक्रार दाखल करण्यासाठी राघवेंद्र दुबे मीरा रोड पोलीस ठाण्यात गेले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर पहाटे दुबे यांचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळून आला. या हल्ल्यामागे बारमालकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, गुरूवारी सकाळी सांताक्रुझ येथे वार्तांकनासाठी गेलेल्या एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला मारहाण केल्याची घटना समोर आली. ही घटना ताजी असतानाच आता मीरा रोड येथील या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे.