शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त शनिवारी वाऱ्याच्या वेगाने पसरले आणि तमाम शिवसैनिकांनी कलानगरातील ‘मातोश्री’वर धाव घेतली. शिवसेनाप्रमुखांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी ‘मातोश्री’ बाहेरच ठिय्या मांडला. अखेर रविवारी सकाळी ९.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा निघाली आणि रात्र जागवणाऱ्या शिवसैनिकांना त्यांचे अखेरचे दर्शन घडले.
बाळासाहेब ठाकरे यांचे शनिवारी दुपारी ३.३३ वाजता निधन झाले आणि तमाम चाहत्यांनी ‘मातोश्री’ गाठली. रविवारी सकाळी ७ वाजता कलानगरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. काही शिवसैनिक रात्रभर तेथेच थांबले होते. त्यापैकी अनेकांना अश्रु आवरता येत नव्हते. काही शिवसैनिक ट्रॉलर सजविण्यात गुंतले होते. अनेकांनी रात्रीच शिवाजी पार्कवर गाठले. रविवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष करीत ‘मातोश्री’वर धडकू लागले आणि त्यांनी ‘मातोश्री’च्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या मांडला. गर्दी वाढत होती आणि हळूहळू कलानगर परिसर शिवसैनिकांच्या आक्रोशाने सुन्न झाला. सकाळी सात वाजता शिवसेनाप्रमुखांची अंत्ययात्रा शिवाजी पार्कच्या दिशेने निघणार होती. हळूहळू घडय़ाळाचे काटे पुढे सरकत होते. सकाळी नऊच्या सुमारास ‘मातोश्री’मध्ये हालचाल सुरू झाली. ठाकरे कुटुंबिय शिवसेना नेत्यांसोबत बंगल्याबाहेर पडले. उद्धव ठाकरे आणि काही ज्येष्ठ नेत्यांनी बाळासाहेबांचे पार्थिव बंगल्याबाहेर आणले. पोलिसांनी ९.२० च्या सुमारास पोलिसांनी शिवसेनाप्रमुखांना सलामी दिली. पार्थिव सजवलेल्या ट्रॉलरवर ठेवण्यात आले आणि ट्रॉलरला शिवसैनिकांचा गराडा पडला. शिवसेनाप्रमुखांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शिवसैनिक धडपडत होते. रस्त्याला दुतर्फा उभे राहिलेले स्थानिक रहिवासी सेनाप्रमुखांना पुष्पहार अर्पण करीत होते. बाळासाहेबांना अखेरचे डोळेभरून पाहता यावे यासाठी काही जण झाडांवर, तर काही जण जाहिरातींच्या लोखंडी पिलर्सवर बसले होते. पुनर्विकासाअंतर्गत आकारास येत असलेल्या टोलेजंग इमारतींमध्ये गर्दी करून अनेक जण अंत्ययात्रा न्याहाळत होते. शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिलच्या जागेवर आकारास येत असलेल्या टोलेजंग इमारतीवरही अनेकांनी गर्दी केली होती. दुतर्फा इमारतींमध्येही बघ्यांनी गर्दी केली होती. हळूहळू उन्ह चढत होते. मात्र अंत्ययात्रेतील गर्दी कमी होत नव्हती. उलटपक्षी ठिकठिकाणी अंत्ययात्रेत शिवसैनिक सहभागी होत होते. महिला आणि वृद्धही मोठय़ा संख्येने अंत्ययात्रेत सहभागी होत होते. बाळासाहेबांचे पार्थिव ठेवलेल्या गाडीजवळ शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाली होती. गाडी पुढे हाकणे चालकाला अवघड बनत होते. वाहनापासून दूर होण्याचे आवाहन वारंवार शिवसैनिकांना करावे लागत होते. शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा जयघोष करीत अंत्ययात्रा मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती.
शिवाजी पार्कवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बाळासाहेबांचे  पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईबाहेरून आलेले तमाम शिवसैनिक थेट शिवाजी पार्कवर थडकले होते. दुपारी १२ पर्यंत शिवाजी पार्क मैदान गर्दीने ओसंडून वाहू लागले. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये जमलेल्या शिवसैनिकांपैकी काही जण अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी माघारी आले. तरीही शिवसैनिकांचे नवे लोंढे शिवाजी पार्कमध्ये दाखल होत होते. आसवे ढाळत अंत्ययात्रेची प्रतीक्षा करीत होते.. मुंबई आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे २० लाख चाहत्यांनी आज आपल्या या दैवताचे अखेरचे दर्शन घेऊन अखेरचा निरोप दिला, असे पोलिसांनी सांगितले.

अंतिम यात्रा
बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त कळताच देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांचा ओघ सुरू झाला. मडगाव येथून कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी सोडण्यात आली होती. मुंबईला येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला बोरिवली आणि अंधेरी येथे विशेष थांबा देण्यात आला होता. दादर येथे येणाऱ्या शिवसैनिकांसाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले होते. त्याचप्रमाणे सायंकाळी दिल्लीला जाणाऱ्या राजधानी आणि विशेष गाडीलाही बोरिवली येथे थांबा देण्यात आला होता.
*  गर्दीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये काही जणांना मूच्र्छा आली, काही जणांना अस्वस्थ वाटू लागले. यामुळे एका रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. मातोश्रीच्या दरवाजात फुलांनी सजवलेला एक ट्रक अंतिम यात्रेच्या तयारीसाठी सज्ज झाला होता. ट्रकवर ऑर्कीडची फुले लावण्यात आली होती. वारंवार विनंती करूनही शिवसैनिक महिला आणि पुरूष पोलिसांचे कडे भेदून त्या ट्रकजवळ जाण्याचा प्रयत्न करीत होते.
* बरोबर नऊ वाजता ठाकरे कुटुंबिय मातोश्रीबाहेर आले. नऊ वाजून पाच मिनिटांनी बाळासाहेबांचे पार्थिव बाहेर आणण्यात आले. त्यांचे पार्थिव तिरंग्यामध्ये लपेटण्यात आले आणि त्यांना पोलीस दलातर्फे अखेरची सलामी देण्यात आली. पोलिसांच्या वाद्यवृंदाच्या शोकमय सुरामध्ये ९.१५ मिनिटांनी फुलांनी सजवलेल्या ट्रकवर तिरक्या ठेवलेल्या फलाटावर पार्थिव ठेवण्यात आल्यावर त्याच्या भोवती उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी, मुलगा आदित्य तसेच काही कार्यकर्ते या फलाटाभोवती उभे राहिले. पाठीमागे ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्य, स्मिता ठाकरे, राज ठाकरे यांच्या पत्नी आणि मुलगा तसेच मुलगी, शिवसेनेचे विभागप्रमुख आणि काही मान्यवर या ट्रकवर उभे राहिले. ९.२५ वाजता अंतिम यात्रेला प्रारंभ झाला.
* बाळासाहेबांचे पार्थिव घेऊन ट्रक हलला आणि एकच आकांत झाला. ‘बाळासाहेब’ असा आक्रोश संपूर्ण जनसमुदायातून उठला आणि अनेकांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या रूपातून वाट करून दिली. ट्रक त्या शोकाकूल जनसमुदायाच्या मध्ये आला तेव्हा आदित्य आणि उद्धव दोघांनाही आपले अश्रू आवरले नाहीत. यावेळी मोठय़ा प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. पण प्रत्येकजण दुसऱ्याला सावरून धरत त्या ट्रकवर विराजमान असलेल्या आपल्या लाडक्या नेत्यांचे अंतिम दर्शन आपल्या डोळ्यात आणि मोबाइलमध्ये साठवून घेत होते. कलानगरहून माहीमकडे जाण्याचा मार्ग अत्यंत चिंचोळा होता आणि तेथे जनसमुदाय मोठय़ा प्रमाणात आस्ते कदम पुढे सरकत होता. प्रभोधनकार ठाकरे पुलावर पोलिसांनी प्रथम कोणालाही प्रवेश दिला नव्हता परंतु यात्रा सुरू झाली आणि अनेकांनी या पुलावरून आपल्या नेत्याला अभिवादन केले.
* सकाळी ९.४० वाजता यात्रा स्कायवॉकच्या जवळ आली. तेथून अत्यंत धीम्या गतीने ती माहीमच्या दिशेने निघाली. १०.१५ वाजता माहीम कॉजवेच्या दिशेने या यात्रेने आपली मार्गक्रमणा सुरू केली. माहीमला दुतर्फा महिला मोठय़ा प्रमाणातच उभ्या होत्या. तर महामार्गावर असलेल्या पादचारी पुल आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहीरात फलकांवरही अनेकांनी आपली बैठक जमवली होती. मच्छिमार कॉलनीजवळ यात्रा येण्यास तब्बल १०.५० वाजले. यानंतर गर्दीमुळे यात्रेचा वेग अतिशय मंदावला आणि माहीम बस डेपोजवळ पोहोचण्यासाठी ११.२५ वाजले.
* सकाळी १० वाजेपर्यंत सेनाभवनवर बाळासाहेबांचे पार्थिव आणण्यात येणार होते पण माहीम येथेच साडेअकरा वाजले. यामुळे माहीमच्या पॅराडाइज सिनेमागृहापाशी मोठी कोंडी झाली होती. १२.२५ वाजता यात्रा तेथे पोहोचली. बाळासाहेबांच्या पार्थिवावर गर्दीतून फुले उधळण्यात येत होतीच. पण जाहिरातीच्या फलकांवर चढून बसलेल्यांनीही पुष्पांजली अर्पण केली.
* अंत्ययात्रेला उशीर होऊ लागला तसतसा सेनाभवन आणि शिवाजी पार्क येथे जमललेल्या शिवसैनिकांची धीर सुटू लागला. त्यांनी माहीमच्या दिशेने चालण्यास सुरूवात केली. माहीम परिसरात लेडी जमशेटजी मार्गावर असलेल्या दुतर्फा इमारतींमधून लोकांची गर्दी झाली होती. १.२५ वाजता यात्रा सिटीलाइट सिनेमागृहापाशी पोहोचली. दुपारी २.०५ वाजता राजा बढे चौक आणि २.४० वाजण्याच्या सुमारास सेना भवन येथे यात्रा पोहोचली.
* धुळे येथून आलेल्या तरूणांनी ८६ मीटर लांबीचा भगवा ध्वज शिवतीर्थावर आणला होता. २.४५ वाजता त्यांनी हा ध्वज आमदार विनोद घोसाळकर यांच्या स्वाधीन केला. तत्पूर्वी संपूर्ण मैदानात हा ध्वज फिरविण्यात आला होता.
* नाशिक जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात शिवसैनिकांची रीघ मुंबईकडे लागली होती. नाशिकच्या चांदवड येथून सुमारे २०० शिवसैनिकांचा गट पहाटे तीन वाजता निघाला आणि सकाळी सात वाजता शिवाजी पार्क येथे पोहोचला.
* पेण येथील पांडापूर येथूनही काहीजण येथे रात्रीच मुंबईत आले होते. हे सगळेजण रात्री शिवतीर्थावर थांबले होते. सकाळपासून सिटीलाईट चौकामध्ये त्यांनी ठाण मांडले होते. स्कायवॉकवरून आम्ही दर्शन घेतले, पण अजून मन मानत नाही, असे रमेश ठाकूर यांनी सांगितले.

Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…