सेना-भाजपच्या वचननाम्याला अर्थसंकल्पात वाटाण्याच्या अक्षता

५०० चौरस फुटापर्यंत घरांना मालमत्ता करमाफी, मोफत आरोग्य सुविधा, रस्तेकर रद्द अशा एक ना अनेक आकर्षक आश्वासनांच्या जोरावर मुंबई महापालिकेत जास्त नगरसेवक जिंकवून आणणाऱ्या शिवसेना-भाजपच्या वचननाम्यांना आयुक्त अजोय मेहता यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. बुधवारी पालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त अजोय मेहता यांनी शिवसेनेच्या वचननाम्यातील आणि भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांकडे दुर्लक्ष करत वास्तववादी पारदर्शी अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी सेनेच्या वचननाम्याच्या अंमलबजावणीबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ करण्याचे स्वप्न दाखविले होते. मात्र पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये या मालमत्ता कर माफीला ठेंगा दाखविण्यात आला आहे. शिवसेनेने वचननम्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, पालिका शाळात शिकलेल्यांना मनपात प्राधान्याने नोकरी, शालेय गणवेश असलेल्या विद्यार्थ्यांना बेस्टमधून मोफत प्रवास, मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी स्थानक उभारणी, चार मोठे जलतरण तलाव, पालिका रुग्णालयात ‘जेनरिक’ औषधांची व्यवस्था, सागरी पर्यटन, उद्याने, मैदाने, ई-वाचनालय, कौशल्य विकास, पालिका संगीत अकादमी,कोस्टल रोड, खड्डय़ांचा प्रश्न कायमचा निकाली काढणे अशी अनेक वचने दिली आहेत. यापैकी विद्यार्थ्यांना बेस्टमधून मोफत प्रवास हे आश्वासन वगळता शिवसेनेने दिलेल्या वचननाम्यावर कोणतेही भाष्य आयुक्तांच्या अर्थसंकल्पात नाही. एवढेच नव्हे तर भाजपने रस्ते कर न घेण्याच्या मांडलेल्या भूमिकेलाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि पारदर्शकतेच्या पहारेऱ्यांच्या भूमिकेत असलेल्या भाजपने निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईकरांना दिलेल्या आश्वासनांना २०१७-१८ च्या अर्थसंकल्पामध्ये ठेंगा दाखविण्यात आला आहे.

पालिका शाळेतील गणवेष परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना बेस्टच्या बसमधून विनामूल प्रवासाची सुविधा देण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाची पालिका आयुक्तांनी पूर्तता केली आहे. त्यासाठी पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र ५०० चौरस फुटाच्या घरामध्ये वास्तव्य असलेल्या मुंबईकरांना मालमत्ता कर माफी आणि ७०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांना मालमत्ता करामध्ये सवलत देण्याबाबत कोणतेच सूतोवाच आगामी अर्थसंकल्पात करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर भाजपने निवडणुकीच्या काळात मुंबईकरांना दिलेल्या आश्वासनाचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही.

कोणतीही करवाढ वा नवा कर लागू करण्यात आला नसला तरी शिवसेना, भाजपच्या आश्वासनांचीही पूर्तता अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. मालमत्ता करात सवलत मिळण्याची अपेक्षा असलेल्या असंख्य मुंबईकरांच्या पदरी निराशा पडली आहे. तर मतदारांना दिलेल्या वचनाची पूर्तता होऊ न शकल्यामुळे शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.