याकूब मेमनच्या फाशीच्या विरुद्ध मतप्रदर्शन करणाऱ्या चित्रपट अभिनेता सलमान खान याच्याविरोधात शिवसेना आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली. कारावासाची शिक्षा झालेल्या सलमानचा जामीन रद्द करण्याची मागणी भाजपने केली, तर शिवसेनेने त्याच्या चित्रपटाचा खेळ बंद पाडला.

बेदकारपणे गाडी चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सलमान खानला न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली असून सध्या तो जामिनावर बाहेर आहे. हा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली. याकूबच्या शिक्षेच्या विरोधात मतप्रदर्शन करून सलमानने सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला आहे. यावरून त्याचा न्यायप्रक्रियेवर विश्वास नाही हेच स्पष्ट होते. आता त्याने माफी मागितली असली तरी न्यायालयानेच त्याच्या जामिनाबद्दल निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेलार यांनी व्यक्त केली आहे. या मागणीसाठी शेलार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सलमानचे हे उद्योग आपण लोकसभेत मांडणार असल्याचे जाहीर केले. सलमानने देशाची माफी मागावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी सलमान खानच्या घरासमोर निदर्शने केली. तेव्हा देशद्रोही सलमान खान अशा घोषणा देण्यात आल्या. याकूबची बाजू घेणाऱ्या सलमानची तात्काळ तुरुंगात रवानगी करण्याची मागणी करण्यात आली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सलमानवर टीका केली. शिवसेनेच्या वतीने सातारा तसेच राज्यात अन्यत्र सलमानच्या चित्रपटाचा खेळ बंद पाडण्यात आला.