मुंबई गुरेमुक्त करण्याचा निर्णय पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील तबेल्यांसह ३१ हजाराहून अधिक जनावरांचे पालघर जिल्हय़ातील दापचरी येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती दुग्धविकास विभागांतर्गत येणाऱ्या गुरे नियंत्रण योजनेचे नियंत्रक रत्नाकर अहिरे यांनी दिली.

राज्य सरकारने २००६ व २००९ मध्ये अधिसूचना काढून मुंबईत गुरे पाळणे व त्यांची ने-आण करणे यावर बंदी घातली होती. त्यातून फक्त आरे दुग्ध वसाहतीचे क्षेत्र वगळण्यात आले होते. मात्र त्यानंतरही मुंबईत अनधिकृतपणे गुरे पाळली जात आहेत, असे आढळून आले आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या होत्या. त्यावर अलीकडेच न्यायालयाने मुंबई शहर व उपनगरातील सर्व तबेले व जनावरांचे दापचरी येथे स्थलांतर करावे, असे आदेश दिले होते.

गुरांचा चारा नाल्यात टाकला जातो. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबले जाते. प्रदूषण होते, त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. याचा विचार करून व न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व जनावरे व तबेले दापचरी येथे हलवली जाणार आहेत. तबेले बांधण्यासाठी तेथे भाडय़ाने जागा देण्यात येणार आहे, असे नियंत्रकांनी सांगितले. ही कार्यवाही वेगाने करण्यात येणार आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत ३१ हजार जनावरांची नोंद झाली आहे. त्यात म्हशींचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत जनावरांची ही संख्या आणखी वाढली असल्याचा अंदाज आहे.