आज दिवसभर मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. ठाणे, नाशिक, मराठवाड्यासह पावसाने अनेक ठिकाणांना झोडपले. यातही ठाणे शहराला पावसाचा जोरदार फटका बसला असून रेल्वेसह रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मध्य रेल्वेचा रविवारचा मेगाब्लॉकही या पावसामुळे रद्द करण्यात आला होता. ठाण्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पण आता पावसाचा जोर ओसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. वाहतूक पूर्ववत झाली असली तरीही रेल्वे गाड्या २० ते  २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

RAIN 4

महाराष्ट्राच्या सर्वच भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. कोकण किनारपट्टीसह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच विदर्भातही अनेक नद्यांच्या परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंबिवली, ठाणे, घोडबंदर हा परिसरही जलमय झाला होता. तसेच वसई-विरार परिसरातही मुसळधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

पावसाचा जोर आता ओसरला असला तरी येत्या चोवीस तासात कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

 

rain 2