तांत्रिक बिघाड आणि प्रवाशांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. लोकल गाड्यांच्या रखडपट्टीमुळे संतप्त प्रवाशांनी टिटवाळा स्थानकात रेलरोको केला होता. तब्बल अडीच तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असून आता मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यानच्या काळात लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे सीएसटीकडे येणाऱ्या प्रवाशांना एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेमार्गावरील खडवली स्थानकाजवळ प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेले पॉवरब्लॉकचे काम रखडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. महिन्याभरात दुसऱ्यांदा खोळंबा झाल्याने प्रवाशांचा पारा चढला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी टिटवाळा रेल्वे स्थानकात आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सध्या कल्याण ते कसारा मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावर सध्या लोकल गाड्यांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय, अनेक एक्स्प्रेस गाड्याही अडकून पडल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून सध्या शक्य तितक्या लवकर तांत्रिक काम पूर्ण करण्याचे प्रयत्न  सुरू असल्याच्या उद्घोषणा रेल्वे स्थानकांवर केल्या जात आहेत. सकाळची वेळ असल्याने चाकरमानी कामानिमित्त मुंबईच्या दिशेने येत असतात. मात्र सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, कल्याणपासून सीएसटीपर्यंतची लोकल वाहतूक सुरळीत सुरू आहे.

काल रात्रीपासून रेल्वे प्रशासनाने खडवली स्थानकाजवळ पॉवरब्लॉकचे काम हाती घेतले होते. मात्र, हे काम काही कारणामुळे लांबले. त्यामुळे आज सकाळी वाहतूक सुरू झाल्यानंतर या मार्गावरील लोकल गाड्यांचा खोळंबा झाला. टिटवाळा येथे सकाळी ५.५५ च्या लोकलआधी एक्स्प्रेस गाड्या रवाना करण्यात आल्या. त्यामुळे स्थानकातील प्रवाशी संतापले आणि त्यांनी कसारा ते कल्याणदरम्यानच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे. सध्या प्रवासी रूळावर उतरले असून त्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली आहे. अद्यापपर्यंत प्रवाशांचा राग शमविण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या खोळंब्यामुळे दिवा आणि बदलापूर स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा अशाप्रकारे उद्रेक झाला होता.