सरकारचा निर्णय; उपलब्धतेबाबत मात्र अनिश्चितता

राज्य सरकारने दिवाळी सणाच्या तोंडावर खुल्या बाजारात ७८ रुपये प्रति किलो चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सणाची लगबग सुरू झाली आहे. मात्र ही स्वस्त डाळ बाजारात कधी उपलब्ध होणार, याबद्दल अनिश्चितता आहे. पुन्हा ही स्वस्त दरातील डाळ सातच शहरांमध्ये विकली जाणार आहे, मग उर्वरित शहरांतील व ग्रामीण भागांतील जनतेने महागाईची डाळ खरेदी करायची का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिवाळीसाठी चणाडाळीची मोठय़ा प्रमाणावर खरेदी होते. नेमकी या सणाच्या तोंडावरच चणाडाळीचे भाव प्रति किलो १५० रुपयांच्या वर गेले आहेत. त्याचा विचार करून सर्वसामान्यांनाही चणाडाळ खरेदी करता यावी, यासाठी दर कमी करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे.

केंद्राकडून ५० रुपये प्रति किलो दराने ७०० मेट्रिक टन चणा खरेदी केला जाणार आहे. त्याची डाळ करून प्रति किलो ७८ रुपये दराने बंद पाकिटात ती खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात तसेच पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती व औरंगाबाद या शहरांमध्येच ही स्वस्तातील डाळ उपलब्ध होणार आहे. अन्य शहरांतील डाळीचे दर १५० रुपयांच्या वर आहेत, मात्र तरीही फक्त विशिष्ट शहरांमध्येच स्वस्तातील डाळ का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्वस्तात चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात डाळीची बाजारात विक्री कधी सुरू होणार, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेला नाही.