राज्यातील काही टोलनाके बंद करण्याचे कोणतेही आश्वासन मी राज ठाकरे यांना दिलेले नाही. त्यांना आश्वासन द्यायला ते काही आमदार, खासदार नाहीत. केवळ एका पक्षाचे प्रमुख आहेत. यापुढेही टोलच्या प्रश्नावरून ते चुकीचे वागले तर त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिला. एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील माझा कट्टा या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
ते म्हणाले, राज्यातील टोल आकारणीचा आढावा घेण्यासाठी सरकारने एक समिती नेमली आहे. त्याचा अहवाल आचारसंहिता लागू होण्यापूर्वी येईल, असे मला वाटले होते. त्यामुळे मी टोलच्या विषयावर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घेऊ, असे राज ठाकरे यांना म्हणालो होतो. मात्र, आमची बैठक संपल्यावर राज ठाकरेंनी पत्रकारांना वेगळीच माहिती दिली. आचारसंहिता संपल्यावर या प्रश्नावरून राज ठाकरे चुकीचे वागले, तर त्यांच्यावर सरकार कारवाई करेल.