एसीबीचे सापळे थंडावले;  म्हाडा, झोपुकडून मंजुऱ्या रखडल्या

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे लाचखोरी कमी झाल्याची अजिबात चिन्हे दिसून येत नाहीत. उलटपक्षी, नव्या नोटा किंवा अन्यथा शंभराच्या नोटा हव्यात, असा आग्रह लाचखोरांनी धरला आहे. म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने खुल्या बाजारात विक्री करावयाच्या चटई क्षेत्रफळांच्या फायलीच्या मंजुऱ्या तूर्तास प्रलंबित ठेवल्या आहेत.

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दर दिवशी तीन ते चार प्रकरणे दाखल होत असतात. पंतप्रधानांनी चलनबंदीची घोषणा केली त्या दिवशी राज्यात चार प्रकरणे नोंदली गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन प्रकरणे नोंदली गेली. यापैकी एका प्रकरणात सरकारी अधिकाऱ्याने फक्त शंभराच्या नोटांची लाच स्वीकारली. ११ नोव्हेंबर रोजी नव्या नोटा उपलब्ध नसल्यामुळे सापळा रचला गेला नाही. १२ नोव्हेंबर रोजी नव्या दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारताना कोल्हापूर येथील सापळा यशस्वी झाला. १३ नोव्हेंबर रोजी तीन प्रकरणे नोंदली गेली. यापैकी पुण्याच्या प्रकरणातील निवडणूक नोंदणी कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाने ५० हजारांची लाच शंभराच्या २०० व दोन हजारांच्या १५ नोटांच्या स्वरूपात लाच स्वीकारली. आताही या विभागाकडे अनेक प्रकरणे दाखल आहेत; परंतु सापळा रचण्यासाठी नव्या नोटांची आवश्यकता असल्यामुळे तूर्तास काही सापळे लांबणीवर टाकण्यात आले आहेत. नव्या नोटा उपलब्ध झाल्या की, लगेच सापळे रचले जातील याकडे एसीबीतील एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले. जुन्या नोटा स्वीकारण्यास लाचखोरही नकार देत असल्याचे हा अधिकारी म्हणाला.

म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात खुल्या विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या चटई क्षेत्रफळापोटी चौरस फुटामागे दर आकारला जातो, हे सर्वज्ञात आहे. ही रक्कम लाख ते कोटीच्या घरात असते; परंतु नव्या नोटा उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी आता काही दिवस थांबण्याचे ठरविले आहे. लाचेपोटी द्यावयाच्या रकमेसाठी नव्या नोटांची व्यवस्था झाल्यानंतरच फाइलवर सही केली जाईल, अशी भूमिका यापैकी काही अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता संबंधित विकासक मोठय़ा प्रमाणात नव्या नोटा कशा उपलब्ध होतील, याची काळजी घेत आहेत. त्यामुळे मंजुऱ्या रखडल्याचेही या विकासकांनी सांगितले. नव्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. शंभराच्या नोटांची मर्यादा लक्षात घेता आता महिनाभर तरी थांबावे लागेल, असे एका विकासकाने सांगितले.

कर्मचाऱ्यांचा सव्वातीन कोटींवर डल्ला

सांगली: जिल्ह्यातील एटीएम केंद्रामध्ये पसे भरण्याचा ठेका असणाऱ्या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी या केंद्रावर पूर्वी भरलेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांमधील ३ कोटी ३३ लाख रुपयांच्या चलनावर डल्ला मारला आहे. नोटा बंदीनंतर केलेल्या पाहणीत आज हे प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणी कंपनीने मिरजेतील दोघांविरुद्ध  तक्रार दाखल केली असून हे दोघेही फरार आहेत. जिल्ह्यातील १७ एटीएम केंद्रांवर चलन भरण्याचा ठेका दिल्लीतील एका कंपनीकडे होता.