मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस तर चौघांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध सुरू असलेला खटला लवकरात लवकर पूर्ण करण्याचे संकेत सत्र न्यायालयाने सोमवारी दिले. दरम्यान, हजर राहण्याचे बजावूनही सलमान सोमवारी हजर न झाल्याने त्याबाबत असमाधान व्यक्त करीत ३ डिसेंबर रोजी न्यायालयाने त्याला हजर राहण्याचे बजावले आहे.
सलमानच्या विरोधात चालविण्यात येणाऱ्या खटल्याचे कामकाज पाहणारे अतिरिक्त न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सरकारी वकिलांना डिसेंबर अखेरीपर्यंत साक्षीपुरावे पूर्ण करण्यास सांगत खटला लवकरात लवकर पूर्ण करण्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे सुनावणीस गैरहजर राहू देण्याची विनंती सलमानतर्फे अर्जाद्वारे करण्यात आली.
परंतु सुनावणीस हजर राहण्याचे आपण बजावलेले असतानाही त्याने ही विनंती केल्याने न्यायालयाने त्याप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारी पक्षातर्फेही सलमानच्या अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला. अखेर न्यायालयाने सलमानचा गैरहजर राहण्याची विनंती मान्य करीत ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीस मात्र जातीने हजर राहण्याचे न्यायालयाच्यावतीने त्याला बजावले आहे.