ओरिसातील नामवंत चित्रकार अनुप कुमार चंद यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगिर आर्ट गॅलरी येथे २६ एप्रिल ते २ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. नऊ रस व त्यातून उत्पन्न होणारे मानवी भाव यांचे मनमोहक चित्रण असलेली चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. ओरिसातील बालासोर जिल्ह्य़ातील अनुप कुमार यांनी खैरागड येथील इंदिरा कला व संगीत विश्वविद्यालयात चित्रकलेचे रीतसर शिक्षण घेतले आहे. कलाक्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी ओरिसातील किनारपट्टीवरील लोककला या विषयावर संशोधनही केले आहे. तसेच आतापर्यंत अनेक एकल व सामूहिक प्रदर्शनातून चित्रे सादर केली आहेत. जहांगिरमधील प्रदर्शनात मांडलेल्या त्यांच्या चित्रांमध्ये शृंगार, बीभत्स, वीर, शांत, रौद्र, करुणा, अद्भुत आदी रसांचा आविष्कार पाहायला मिळतो. नवरसांचा आविष्कार असलेल्या या चित्रांमध्ये ओरिसातील सामाजिक व भौगोलिक परिसरातील लोकजीवनाचे चित्रण करण्यात आले आहे.
कधी- २६ एप्रिल ते २ मे, स. ११ ते सायं. ७ वा.
कुठे- जहांगिर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा.

नृत्याचा अमर्याद आनंद
नृत्य हा मानवी अभिव्यक्तीचा सुंदरतम आविष्कार. नृत्याच्या विविध प्रकारांतून सृष्टीची अनेक रूपेच आपल्यासमोर उभी केली जात असतात. प्रत्येक प्रदेश, देश, संस्कृतीने आपले नृत्याविष्कार जपले आहेत, वाढवले आहेत. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या भारतात तर संस्कृती-उपसंस्कृती, प्रदेशांनुसार विविध नृत्य प्रकार, शैली पाहायला मिळतात. या विविध प्रकारच्या नृत्यांचा आविष्कार शुक्रवारी कर्नाटक संघ सभागृहात होणाऱ्या नृत्य महोत्सवात पाहायला मिळणार आहे. मुंबई येथील ‘शिवोहम इन्स्टिटय़ूट ऑफ परफॉर्मिग आर्ट्स’ व शिमला येथील ‘ऑल इंडिया आर्टिस्ट असोशिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या निमित्ताने ‘दि डान्झा-डान्सिंग बियॉण्ड बाऊंडरीज’ या नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिव्या वारीअर व राखी या मोहिनीअट्टम व ओडीसी नृत्यातून कृष्णाचे दहा अवतार सादर करणार आहेत. अनुश्री बॅनर्जी या भरतनाटय़म व रवींद्र या दोन नृत्य प्रकारांचे तर जी. रथीश बाबू हे कुचीपुडी नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. तसेच वैभव जोशी यांचे सुफी कथ्थक तर रिचा गुप्ता यांची विविध प्रकारच्या वाद्यांशी कथ्थक नृत्याची जुगलबंदीही पाहायला मिळणार आहे.
कधी- शुक्रवार, २९ एप्रिल, सायंकाळी- ७ ते ९ वा.
कुठे- कर्नाटक संघ सभागृह, माटुंगा.

‘प्रात:स्वर’मध्ये सतार-सरोद जुगलबंदी
‘पंचम निषाद’ या संगीतप्रेमींसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेकडून गेल्या दहा वर्षांपासून ‘प्रात:स्वर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. ऑक्टोबर ते मे दरम्यान प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी सकाळी प्रात: रागांची मैफील आयोजित केली जाते. गेल्या दहा वर्षांत प्रात:स्वरचे ७८ कार्यक्रम झाले असून येत्या रविवारी ७९वा कार्यक्रम सतार व सरोदच्या जुगलबंदीने रंगणार आहे. आतापर्यंत अनेक नवोदित तसेच दिग्गज कलाकारांनी प्रात:स्वरमध्ये सादरीकरण करून संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले आहे. रविवारी पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलांगणात होणाऱ्या प्रात:स्वरमध्ये लक्ष मोहन व आयुष मोहन या युवा कलाकारांची सतार-सरोद जुगलबंदी होणार आहे. आयुष व लक्ष यांनी पं. बलवंत राय वर्मा यांच्याकडे शिक्षण घेतले असून आतापर्यंत त्यांचे ‘द मॅजेस्टिक कोर्ट’, ‘एकोज फ्रॉम द यलो लॅण्ड’ हे अल्बमही आले आहेत. वादनाचे तंत्र, भावनामयता, रागांमधील शुद्धता व सांगीतिक सौंदर्याची जाण यांच्या साहाय्याने जुगलबंदीची त्यांची एक शैली तयार झाली आहे. या शैलीला संगीतप्रेमी व समीक्षकांनाही आकर्षित केले आहे. या वेळी होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना अनुब्रता चॅटर्जी व ओजस अधिया हे तबल्यावर साथसंगत करणार आहेत. त्यामुळे रविवारची सकाळ संगीतमय करण्याची पर्वणीच प्रात:स्वरमुळे रसिकांना उपलब्ध झाली आहे.
कधी- रविवार, १ मे, सकाळी ६.३० वा.
कुठे- कलांगण, पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी.

शास्त्रीय, समकालीन नृत्याचा ‘महोत्सव’
जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधत शास्त्रीय व समकालीन नृत्याचा मिलाफ साधणाऱ्या तीनदिवसीय ‘सिंधु महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. सांख्य डान्स कंपनी व मुद्रा स्कुल ऑफ परफॉर्मिग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा महोत्सव २९ एप्रिल ते १ मे दरम्यान मुंबई व ठाणे येथे रंगणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी एनसीपीएमधील टाटा थिएटरमध्ये संत व विठ्ठलाचे नाते उलगडून सांगणारा ‘नामा म्हणे’ ही अभिनव प्रयोग होणार आहे. या वेळी जागतिक कीर्तीच्या कथक नृत्यांगणा अदिती मंगलदास आपली कला सादर करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे प्रसिद्ध ओडीसी नृत्यांगणा अरुणा मोहांती व त्यांचा गाथा ओडीसी नृत्य समूह तसेच नृत्यांगणा उमा डोगरा, दक्षा मश्रूवाला व विवेक आरेकर हे ‘एकत्व’ व ‘रितू चक्र’ हे नृत्य प्रयोग सादर करणार आहेत. तर शेवटच्या दिवशी ठाण्यामधील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात शाश्वती गराई यांचे नृत्य सादरीकरण तसेच तामिळनाडू येथील रणजीत-विजना या जोडीचे भरतनाटय़म सादरीकरणही होणार आहे.
कधी व कुठे- २९ एप्रिल- टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉइंट, सायंकाळी ६ वा.
३० एप्रिल- रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी. सायं. ६
१ मे- काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे. सायंकाळी ८ वा.

गीत-रामायण हीरक महोत्सव सांगता सोहळा
महाकवी गदिमांची लेखणी आणि स्वरतीर्थ सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचा स्वरसाज या अपूर्व संगमातून साकारलेल्या ‘गीतरामायण’चे प्रथम सादरीकरण एप्रिल १९५५ रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून पहिल्या गीताने झाले होते आणि त्यांची सांगता २० एप्रिल १९५६ रोजी झाली होती. या महान कलाकृतीच्या निर्मितीचा हीरक महोत्सव सांस्कृतिक विश्वासाठी आनंददायी आहे. या ‘हीरक महोत्सवा’चा नागरी स्वरूपाचा भव्य सांगता समारोह होणार आहे. सारस्वत बँक व सांगली वैभव सहकारी क्रेडिट सोसायटी लि. यांच्या संयुक्त प्रायोजकत्वाने आनंद माडगूळकर यांच्या गीतरामायणाच्या सादरीकरणातून साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास केसरी टूर्स प्रायव्हेट लि. यांचा सहभाग लाभला आहे. कार्यक्रम सर्वाना खुला असून विनामूल्य आहे.
प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक यशवंत देव व विशेष उपस्थिती पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड व रवींद्र आवटी आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली केळकर करणार आहेत. या सोहळ्यास नागरिकांना उपस्थित राहण्याविषयी आयोजकांनी आवाहन केले आहे. सदरहू समारोह कार्यक्रमांचे संयोजक सुधाकर देसाई व श्रीकांत फौजदार आहेत. संपर्क- ९८२०२६१२७५.
कधी : १ मे, स ९.३० ते २.
कुठे : रवींद्र नाटयमंदिर, प्रभादेवी

म. कृ. केळकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन
जलरंगातील चित्रांनी आपल्या कलेचा ठसा उमटविलेल्या चित्रकार म. कृ. केळकर यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. यवतमाळसारख्या ठिकाणाहून चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी १९३५ साली ते मुंबईला आले. मुंबईत चित्रमहर्षी सा. ल. हळदणकर यांच्याकडे त्यांनी पाच वर्षे शिक्षण घेतले. चित्रकलेबरोबरच इतर अनेक कला अवगत असणाऱ्या केळकरांनी त्या वेळी स्वातंत्र्यलढय़ातही स्वत:ला झोकून दिले होते. पुढे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कारकीर्द घडवणाऱ्या केळकरांनी भारतात व परदेशात विविध ठिकाणी प्रवास करून त्या त्या ठिकाणचे निसर्गसौंदर्य, लोकांचे पोशाख आदी अनेक वैशिष्टय़े आपल्या चित्रांमधून चितारली आहेत.
निसर्गाचे विविध आविष्कार त्यांच्या चित्रांमध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन ३ ते ६ मे दरम्यान रसिकांना पाहता येणार आहे.
कधी- ३ ते ६ मे
कुठे- नेहरू सेंटर, वरळी.