पाच वर्षांत २९६५ प्रवाशांचा मृत्यू तर ७८८५जण जखमी

रेल्वे बिघाडांचे शुक्लकाष्ठ मागे लागूनही पर्याय उपलब्ध नसल्याने लोकल ट्रेनने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळप्रसंगी आपले जीवही गमवावे लागत आहेत. कधी प्रवाशांच्या चुकीमुळे तर कधी रेल्वेच्या गोंधळामुळे रोज कुठे ना कुठे प्रवासांच्या मृत्यूच्या घटना घडत आहे.  पश्चिम रेल्वेवर याचेच प्रत्यंतर आले असून गेल्या पाच वर्षांत २ हजार ९०० हून अधिक प्रवाशांना रेल्वे अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहे. सर्वाधिक मृत्यू हे विरारमधील अपघातांमध्ये झाले आहेत. तसेच, ७ हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. ठाणे जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेने माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ठाणे जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ओम प्रकाश यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात झालेल्या रेल्वे अपघातांबाबत माहिती अधिकारात मे महिन्यात माहिती मागितली होती. याला पश्चिम रेल्वेकडून गेल्याच आठवडय़ात उत्तर देण्यात आले. यात धक्कादायक माहिती उघड झाली असून चर्चगेट ते डहाणूदरम्यान गेल्या पाच वर्षांत रेल्वे अपघातात २ हजार ९६५ प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. तर, ७ हजार ८८५ प्रवासी जखमी झाले आहेत.

यात विरारमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या मृत्यूंच्या घटनांबाबत संघटनेच्या शर्मा यांनी चिंता व्यक्त केली असून याबद्दल रेल्वेच्या वरिष्ठांना लक्ष देण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जखमींसाठी रेल्वे स्थानकांवर तात्काळ आरोग्य सेवा मिळण्याच्या सुविधांची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अपघातांची आकडेवारी

वर्ष           मृत्यू       जखमी

२०११        ६४६         १५६०

२०१२       ६०४         १५२२

२०१३       ५४१         १६२८

२०१४       ५७८       १५२३

२०१५      ५९६        १६५२