पदवीधर, शिक्षक मतदारसंघात उमेदवारीसाठी चुरस

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, मतदार याद्या तयार करण्यास सुरुवात झाली. ६ नोव्हेंबपर्यंत मतदारांची नोंदणी करण्याचे काम राजकीय पक्षांना करावे लागणार आहे.

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत – शिवसेना (मुंबई पदवीधर), कपिल पाटील – लोकभारती (मुंबई शिक्षक), निरंजन डावखरे – राष्ट्रवादी (कोकण पदवीधर), अपूर्व हिरे – अपक्ष (नाशिक शिक्षक) या चार विद्यमान आमदारांची मुदत पुढील वर्षी जुलै महिन्यात संपत आहे. या चारही मतदारसंघांतील मतदार नोंदणीची अधिसूचना आजच जारी झाली.

६ नोव्हेंबपर्यंत नावे नोंदविण्याची मुदत आहे. यापूर्वी पदवीधर किंवा शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव असले तरी नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. मुंबई शहर व कोकणात मतदार याद्यांमध्ये नावे नोंदविण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये मतदार अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

जास्त मतदार नोंदणी करतो त्या उमेदवार किंवा राजकीय पक्षांचा फायदा होतो, असा इतिहास आहे. यामुळेच सर्वच इच्छुक आपापल्या मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

मुंबईत चुरस

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे लागोपाठ दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याबद्दल शिवसेनेतच नाराजी आहे. शिवसेना आमदार किंवा शिवसैनिकांची कामे करीत नाहीत अशी डॉ. सावंत यांच्याबद्दल तक्रारी आहेत. मंत्रिमंडळातच्या विस्तारात डॉ. सावंत यांचे खाते बदलावे किंवा त्यांना मंत्रिपदावरून दूर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. भाजप आणि शिवसेनेतील वाढती कटुता लक्षात घेता दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेला ही जागा कायम राखणे सोपे नाही. वास्तविक मुंबई पदवीधर हा पारंपारिकदृष्टय़ा भाजपचा बालेकिल्ला होता. ज्येष्ठ नेते मधू देवळेकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत. शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ ओढून घेतला. नवलकर यांनी १८ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर दीपक सावंत हे दोनदा निवडून गेले. भाजप या वेळी मतदार नोंदणीत जोर लावण्याची शक्यता आहे.

मुंबई शिक्षक हा मतदारसंघ पारंपारिकदृष्टय़ा भाजपशी संबंधित संघटनेचा बालेकिल्ला होता. संजीवनीताई रायकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये लोकभारतीचे कपिल पाटील यांनी विजय मिळविला. सध्या कपिल पाटील आणि भाजपमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. शिक्षकांचे वेतन मुंबै बँकेत जमा करण्यावरून कपिल पाटील यांनी भाजप व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी दोन हात केले आहेत. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत कपिल पाटील यांना पराभूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

कोकण पदवीधर हा मतदारसंघ पारंपारिकदृष्टय़ा भाजपचा बालेकिल्ला होता. पण गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी भाजपचे संजय केळकर यांचा पराभव केला होता. वसंत पटवर्धन, अशोक मोडक, संजय केळकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. निरंजन डावखरे यांचे सध्या तळ्यात-मळ्यात सुरू आहे.

भाजपमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. प्रत्येक वेळी ठाणे जिल्ह्य़ातच उमेदवारी दिली जाते. यंदा रत्नागिरी जिल्ह्य़ाला संधी द्यावी, अशी मागणी आहे. राज्यात सर्वत्र भाजपला यश मिळाले. पण कोकणात पनवेल वगळता भाजपची पाटी अन्यत्र कोरी होती. यामुळेच भाजपमध्ये अनेकांचा या मतदारसंघावर डोळा आहे.