धनंजय मुंडे यांचे टीकास्त्र; ‘लोकसत्ता ऑनलाइन’ आयोजित ‘फेसबुक लाइव्ह चॅट’च्या माध्यमातून वाचकांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे

राज्य सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोषत्व बहाल करणारी कंपनी चालवत आहेत अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सरकारमधील घोटाळेबाजांविरोधात सर्व पुरावे देऊनही त्यांना वाचविले जात आहे. घोटाळेबाजांनी खात राहावे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांभाळून घ्यावे, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी या वेळी केली. ‘लोकसत्ता ऑनलाइन’तर्फे आयोजित ‘फेसबुक लाइव्ह चॅट’च्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी वाचकांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. शेतकऱ्यांच्या समस्या, नोटाबंदी, बेरोजगारी, तरुणांची राजकारणातील भूमिका, महापालिका-जिल्हा परिषदांच्या निवडणुका, मराठा आरक्षण, बदलता महाराष्ट्र, कौटुंबिक संघर्ष, घराणेशाही आदी मुद्दय़ांवर त्यांनी मते मांडली. राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार ‘प्रचारामध्ये’ आघाडीवर आहे, असा प्रहार त्यांनी सुरुवातीलाच केला. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी अनेक घोषणा करत त्याची जोरदार जाहिरातबाजी सरकारकडून केली जात आहे. परंतु, राज्यभर दौरे करत असताना प्रत्यक्षात काहीच कामे होताना दिसत नाहीत, असा आरोपही मुंडे यांनी केला.

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या नावाखाली मराठा समाजाच्या मागण्या दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून केला जात आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या आंदोलनाला आमचा पािठबा आहे, असेही ते म्हणाले.

नुसतीच घोषणाबाजी

भाजप सरकार मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या पूर्णपणे विरोधात आहे, असा आरोपही मुंडे यांनी केला. तसेच ओबीसी समाजाच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करायला हवे. अधिकाधिक तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. तसे झाल्यास राजकारणाला लागलेली जातीपातीची कीड नष्ट होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

राज्यासोबतच केंद्रातही घोषणाबाजांचेच सरकार आहे, अशी टीका करून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केले. मुख्यमंत्री हे बोलघेवडे आहेत. त्याबाबतीत पहिला क्रमांक कुणाला द्यायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांना दिला पाहिजे. ते केवळ घोषणा करतात, पण सर्व प्रश्न प्रलंबित आहेत, अशी टीका त्यांनी केली.

पंकजा मुंडेंकडून अपेक्षाभंग

राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या कामगिरीबाबत वाचकांनी प्रश्न विचारला असता पंकजा यांच्या कामगिरीबाबत मुंडे यांनी असमाधान व्यक्त केले. इतके मोठे पद हे संघर्षांतून मिळते. पण ते सहजपणे आमच्या बहीण पंकजा यांना मिळाले आहे. मंत्रिपदाचा वापर सर्वसामान्यांच्या सदुपयोगासाठी व्हावा, अशी अपेक्षा आहे. पण गेल्या दोन वर्षांत केवळ अपेक्षाभंग झाला, असे सांगत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कामगिरीवर बोट ठेवले. भविष्यात पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र येतील का, या प्रश्नावर बोलताना, याविषयी पंकजा यांनाच विचारलेले बरे, असे म्हणत त्यावर अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले.

शरद पवार हे राजकारणातील विश्वविद्यापीठ

मोदींनी शरद पवार यांची स्तुती केल्यामुळे तुमची कोंडी होते का, असा प्रश्न वाचकांनी विचारला असता, राजकारणातील अनेक गोष्टी शरद पवार यांनी मला बोट धरून शिकवल्या, असे स्वत: मोदी यांनीच सांगितले आहे. त्यामुळे त्यात माझी कोंडी होण्याचा प्रश्नच येत नाही. शरद पवार हे राजकारणातील चालते-बोलते विश्वविद्यापीठ आहे. पंतप्रधानांकडून सन्मान स्वीकारलेच पाहिजेत, पण प्रसंगी सरकारविरोधात संघर्ष करण्याचीही तयारी आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.