मुरबाडमधील शाळेला मदतीचा हात; नवी पुस्तके, क्रीडासाहित्याचाही पुरवठा

नळाला पाणी येतंय याचाच त्यांना कोण आनंद.. शिवाय टॉयलेटची व्यवस्था.. भरपूर नवीन पुस्तक आणि जोडीला वेगवेगळे खेळ.. शाळेतील शिक्षकही जाम खूश होते. ठाण्यापासून सुमारे साठ एक किलोमीटर अंतरावरील मुरबाड येथील जिल्हा परिषदेच्या सोनगाव शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जात होते.

ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड, शहापूरपासून आदिवासी भागातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांची अवस्था यथातथाच म्हणावी अशी आहे. कोठे छप्पर नाही, तर कोठे भिंत पडली म्हणून व्हरांडय़ात शाळा चालविल्या जातात. पाण्याचा आणि टॉयलेटचा पत्ता बहुतेक शाळांमध्ये जवळपास नाहीच. जेथे आहे तेथे गावकरी शाळेतील बोरवेलचे पाणी सकाळीच घेऊन जातात. ‘स्वच्छ भारत’साठी कोटय़वधी रुपयांच्या जाहिराती होत असल्या आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची ‘जादू’गरी जाहिराती टीव्हीवर झळकत असल्या तरी स्वच्छतागृह बांधणार कोण या कळीच्या प्रश्नाला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मास्तरांकडे उत्तर नाही.

‘रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन’ यांनी मुरबाडमधील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृह बांधण्याचा संकल्प केला. रोटरीच्या अध्यक्षा माधवी खरोटे, रोहिणी डोंगरे, उशा मुरली, ज्योती चव्हाण आणि आनंद घाटे यांनी मुरबाडमधील शाळांची पाहणी करण्यास सुरुवात केली. सप्टेंबर ते डिसेंबर या काळात मुरबाडमधील अनेक शाळांना भेटी दिल्या. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. माधवी खरोटे यांनी मुरबाडच्या सोनगावमधील पहिली ते चौथीच्या शिक्षणाची व्यवस्था असलेली जिल्हा परिषदेची शाळा निवडली. एक मजली इमारतीत तळ मजल्यावर पहिली व दुसरीचे वर्ग भरतात तर पहिल्या मजल्यावर तिसरी व चौथीचे वर्ग भरत असून एकूण ४५ मुले या शाळेत शिकतात. पन्नास-साठ घरांचे गाव आणि शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याचे माधवी खरोटे यांनी सांगितले.

रोटरीने ‘सीएसआर’ निधीच्या माध्यमातून येथे स्वच्छतागृह बांधले, तसेच बोरवेलच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. याशिवाय मुलांसाठी पुस्तके तसेच फुटबॉलपासून क्रिकेटच्या सामानापर्यंत मैदानी खेळाचे साहित्यही घेऊन दिले. शाळेला एकाने संगणकही भेट दिला होता. जिल्हा परिषदेकडे निधी नसल्यामुळे बहुतेक शाळांची दुरवस्था असून स्थानिक आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे यापुढे आम्ही पाठपुरवा करणार असल्याचे माधवी यांनी सांगितले.

जिल्हय़ातील आणखीही शाळांमध्ये आगामी वर्षांत पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची व्यवस्था करणार असून मुलांच्या ज्ञानाची भूक भागविण्यासाठी येथील शाळांमघ्ये ‘किताब घर’ उभे करणार आहे. – माधवी खरोटे, रोटरी अध्यक्षा