बालमोहन शाळेचे विश्वस्त आणि प्रमुख मार्गदर्शक सल्लागार शिक्षणतज्ज्ञ डॉ. मोरेश्वर शिवराम तथा बापूसाहेब रेगे (८३) यांचे रविवारी रात्री येथे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या बापूसाहेबांना धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने उपक्रमशील शिक्षक हरपल्याची भावना शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे. आज, सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालमोहन विद्यामंदिरात ठेवण्यात येणार आहे.  सकाळी दहा वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
शिक्षणावर नितांत प्रेम आणि ‘मूल्यशिक्षणातून संस्कारक्षम विद्यार्थी घडतात आणि तेच देशाचे भवितव्य घडवितात’, या आपल्या वडिलांच्या शिकवणुकीप्रमाणे बापूंनी अखेपर्यंत शिक्षणाचे कार्य केले. पीएचडीसाठी त्यांनी ‘रत्नागिरी जिल्ह्य़ातील शिक्षणाचा इतिहास’ या विषयाची निवड केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बालमोहन विद्यामंदिरातच नोकरी केली. शिक्षण उपअधीक्षक, मुख्याध्यापक आणि अधीक्षक असा त्यांचा प्रवास झाला. बापू हे उपक्रमशील शिक्षक होते. त्यांनी शिक्षणात सातत्याने नवनवीन प्रयोग केले. शासनाने मराठी शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी शिक्षण सुरू करण्यापूर्वीच त्यांनी बालमोहन विद्यामंदिरमध्ये हे शिक्षण सुरू केले होते. त्यांच्या या उपक्रमशीलतेमुळे त्यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामध्ये अनेक वष्रे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती. याशिवाय त्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतही त्यांनी विविध समित्यांवर काम केले. बालचित्रवाणीवरही सदस्य म्हणून त्यांनी काही वष्रे काम पाहिले. मुंबई महापालिकेच्या धनुका समितीवरही ते कार्यरत होते.