मुंबईकरांनी यंदाच्या पावसाळ्याचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे. २९ ऑगस्टच्या अनुभवानंतर कालच्या पावसामुळे पुन्हा एकदा अनेक अफवा व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. तरी या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून केले आहे.

कालच्या जोरदार पावसानंतर मुंबईमध्ये वादळ येणार आहे तसेच २६ जुलैपेक्षा भयंकर पाऊस मुंबईमध्ये होणार आहे, अशा आशयाचे मेसेजेस व्हायरल झाले आहेत. अनेकांनी या मेसेजेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी या मेसेजेचे स्क्रीनशॉर्ट ट्विट करुन मुंबई पोलिस आणि इतर संबंधित यंत्रणांकडे याबद्दल विचारणा केली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी अधिकृत सुत्रांकडून माहिती मिळेपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नागरिकांना ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

मुंबईवर ढग जमल्याचे सॅटेलाईट फोटो तसेच परदेशातील वादळांचे फोटो मुंबईवर वादळ घोंघावतेय अशा माहितीसहित व्हायरल केले जात आहे. हे मेसेजस खरे वाटावे म्हणून अशा अनेक खोट्या मेसेजसमध्ये हवामान खात्याचे नाव टाकून ते फॉरवर्ड केले जात आहेत. तरी अशाप्रकारचे कोणतेही वादळ मुंबईवर घोंघावत नसून, १७ तारखेपासून पुढील तीन दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तवली होती. कालपासून सतत पाऊस पडत असल्याने असे मेसेजेस व्हायरल झाले असल्याने अनेकजण त्याची सत्यता पडताळून न पाहाता हे मेसेजेस फॉरवर्ड करत आहेत. अशाप्रकारे मेसेजेसची सत्यता न पडताळून पाहता ते फॉरवर्ड करणाऱ्यांविरुद्ध कोणी तक्रार केल्यास त्यांच्याविरुद्ध अफवा पसरवण्याच्या गुन्हा अंतर्गत कारवाई होऊ शकते, असे मत सायबर सुरक्षा तज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना व्यक्त केले. तसेच असे मेसेज फॉरवर्ड करण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहा आणि मगच तो फॉरवर्ड करा, असा सल्लाही माळी यांनी नेटकऱ्यांना दिला.

काय म्हटले आहे व्हायरल होणाऱ्या चुकीच्या मेसेजमध्ये…

सावधान
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टी निर्माण झाला आहे. त्यामुळे २० ते २६ सप्टेंबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. व तसे चिन्ह मागील दोन दिवसांपासून दिसत आहेत. तसेच होणारी अतिवृष्टी ही २६-०७-२००५ पेक्षाही भयंकर असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. कृपया किराणा सामान, औषधे, बॅटरी, दूध, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक वस्तू घरात साठवून ठेवा जेणेकरुन ऐन वेळी धावपळ होऊ नये.

जोक्सचाही पाऊस

एकीकडे काही नेटकरी अफवा पसरवत असताना काही नेटकऱ्यांनी मात्र या अचानक पुन्हा आलेल्या पावसावर जोक्स फॉरवर्ड करुन मज्जा घेत असल्याचे दिसत आहे.

काही व्हायरल झालेले जोक्स

>
यंदा दसऱ्याला रावण जळून नाही बुडून मरणार असेच वाटत आहे हा पाऊस पाहून

>
अरे त्या पावसाचा कोणी पट्टा (कमी दाबाचा की जास्त दाबाचा) घेतला असेल तर देऊन टाका तो पूर्ण मुंबईत शोधतोय… नाहीतर रागाने पाणी तुंबवून ठेवेल… आणि परत बीएमसीचे नाव खराब होईल…

>
वेधशाळेचा इशारा मुसळधार पावसाची शक्यता अंगात चरबी असेल तरच बाहेर पडा