महामंडळाचा कारभार कागदविरहित करणार; सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्ताने चित्रपट संमेलन

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक उद्या (बुधवार) रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महामंडळ निवडणुकीतील मतमोजणीच्या वेळी झालेली गडबड आणि वाद लक्षात घेऊन उद्याच्या बैठकीसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ही बैठक पोलीस संरक्षणात पार पडणार असल्याचे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बैठकीत महामंडळाच्या पुढील पाच वर्षांतील कामकाजाचेही नियोजन केले जाणार आहे.

महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक आणि त्याची मतमोजणी नुकतीच कोल्हापूर येथे पार पडली. महामंडळाचे मावळते अध्यक्ष आणि अन्य दोन माजी अध्यक्षांच्या स्वतंत्र आघाडय़ांना निवडणुकीत सपशेल पराभव पत्करावा लागला होता. महामंडळातील दिग्गज मंडळी पराभूत झाल्यामुळे मतमोजणी ठिकाणी तणावाचे वातावरण होते. तसेच दोन मातब्बर उमेदवारांना मिळालेल्या मतांवरूनही वादविवाद झाला होता. हाणामारीची वेळही आली  होती. त्या पाश्र्वभूमीवर पहिल्या बैठकीत गडबड होऊ नये त्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कामकाजात विविध विषय

नव्या सनदी लेखापालाची नेमणूक करणे, सभासदांच्या सदस्य अर्जाची यादी अद्ययावत करणे, पुढील पाच वर्षांसाठीच्या कामकाजाचे नियोजन करणे आदी विषय बैठकीपुढे आहेत. महामंडळाचे सुमारे २५ हजार सदस्य असून ते एकमेकांशी इंटरनेट किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून कसे जोडले जातील, त्याबाबत काही योजना डोळ्यासमोर आहे. तसेच महामंडळाचा कारभार कागदविरहित करणे, विभागीय स्तरावर महामंडळाचे विभागीय मेळाव्यांचे आयोजन करणे हेही विषय चर्चेसाठी आहेत. पुढील वर्ष महामंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने ‘चित्रपट संमेलन’ घेण्याचा विचार आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा होणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.