मुंबई पुणे दृतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर २० जण जखमी झाले. कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतणारा भाविकांचा टेम्पो पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. यात विशाल भगवा चमार (वय २६), शैला कैलास बंगाली (वय-३२), हौसा भगवान चमार (वय- ४५), गवा वैती (वय-४०), दत्ता वैती (वय-३५), धीरज पाटील (वय-३०) यांचा मृत्यू झाला.
मुंबईतील वर्सोवा येथील मच्छीमार कोळीवाड्यातील भाविक हे खासगी टेम्पो करुन कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन हे सर्व भाविक परतत असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर हद्दीत असलेल्या मांडप बोगद्याजवळ टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात २० भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पनवेल येथील पेनसिया, अष्टविनायक आणि एमजीएम रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. या अपघातामुळे वर्सोवा येथील मच्छीमार कोळीवाड्यावर शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरु आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास बंदी असूनही राजरोसपणे प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे यामुळे समोर आले आहे.