मुलगा अत्यंत कृश असूनही कुपोषित यादीत नाव नसल्याचे उघड

कुपोषणामुळे होत असलेल्या बालकांच्या मृत्यूमुळे पालघरमध्ये आंदोलनाला धार चढलेली असतानाच वाडा तालुक्यात सोमवारी साडेचार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. गेल्या तीन आठवडय़ांतील हा चौथा बालमृत्यू आहे. हा मृत्यू अ‍ॅनिमिया म्हणजे रक्तक्षयाने झाला असल्याचे कारण सरकारी रुग्णालयातून देण्यात आले.

अत्यंत कृश झालेल्या या मुलाला श्वास घेताना त्रास होत असल्याने त्याला सकाळी सव्वासहाच्या सुमारास ठाणे येथील रुग्णालयात पुढच्या उपचारांसाठी पाठवण्यात आले. मात्र ठाणे रुग्णालयाच्या वाटेवरच या मुलाने अखेरचा श्वास घेतला.

हा मुलगा अत्यंत कृश असूनही त्याचे नाव कुपोषित बालकांच्या यादीत नसणे हे अत्यंत धक्कादायक आहे. कुपोषित बालकांच्या आणि बालमृत्यूंच्या सरकारी आकडेवारीमध्ये किती सत्यता आहे ते यावरून दिसते. हा बालमृत्यूदेखील या सरकारच्या अनास्थेचा आणि असंवेदनशीलतेचा बळी आहे, असे मत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक यांनी व्यक्त केले.

गेल्या तीन आठवडय़ांतील हा चौथा बालमृत्यू आहे. २८ ऑगस्ट रोजी मोखाडा येथील सागर वाघ या मुलाचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता. ९ सप्टेंबर रोजी रोशनी सवरा या मुलीच्या मृत्यूनंतर उसळलेल्या आंदोलनामुळे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी २१ सप्टेंबर रोजी या परिसराला भेट दिली. याच दिवशी जव्हार येथील राहुल वाडकर या दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.

२३५ बालकांपैकी १७५ बालके कुपोषित

विठु माउली ट्रस्टकडून मोखाडा व जव्हार येथे २४ व २५ सप्टेंबर रोजी सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आली होती. तेव्हा जव्हार येथे तपासलेल्या २३५ बालकांपकी १७५ बालके कुपोषित होती तर मोखाडा येथील २९५ मुलांपकी ५७ बालके अतिकुपोषित असल्याचे आढळून आले, असे विठु माउली ट्रस्टच्या कार्यकर्त्यांने सांगितले. मोखाडा आणि जव्हार या तालुक्यांमध्ये एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान अनुक्रमे ३२ व ६४ अशा ९६ बालकांचा मृत्यू झाल्याचे श्रमजीवी संघटनेकडून सांगण्यात येते.

या मुलाला रुग्णालयात आणले तेव्हा तो अत्यवस्थ होता. चार वर्षे आठ महिने वय असलेल्या या मुलाचे वजन अवघे १० किलो ७०० ग्रॅम होते. त्याला श्वास घेताना त्रास होत असल्याने ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात त्याला पाठवले गेले.

-प्रदीप जाधव,  वैद्यकीय अधिकारी , ग्रामीण रुग्णालय,वाडा