‘फेसबुक’ आणि प्रत्येकाच्या हातातील मोबाइलमधील ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर रविवारी सकाळपासून ‘मैत्री’ संदेशांचा महापूर सुरू झाला आणि ऑगस्टच्या पहिल्या रविवारी येणाऱ्या ‘फेंडशिप डे’ला ‘संडे फीव्हर’ चढला. दिवसभर श्रावणसरींची उल्हाददायक रिमझिमही असल्यामुळे मुंबईकर तरुणाईच्या उत्साहाही उधाण आले होत़े  रस्ते, पदपथ, उपनगरी गाडय़ा आणि ‘बेस्ट’ बसमध्ये हाताच्या मनगटाला रंगीबेरंगी फ्रेण्डशिप बॅण्ड बांधलेली तरुणाई मोठय़ा प्रमाणात दिसून आली. सायंकाळी मरिन ड्राइव्हपासून ‘गेट वे’ सारखे समुद्र किनारे तरुण-तरुणींच्या जथ्थ्यांनी गजबजून गेले होते.
शनिवारपासून शाळा-महाविद्यालयांत एकमेकांना ‘फ्रेण्डशिप बॅण्ड’ बांधण्यास सुरुवात झाली. अनेकांनी रविवार जागा ठरवून भेटीगाठी आखल्या. हॉटेलांमध्ये जाऊन खादाडी समुद्र किनाऱ्यांवर, चौपाटय़ांवर मनसोक्त भटकंती करत तरुणाईने आनंद लुटला. रविवारी श्रावणसरींनी तशी विश्रांतीच घेतल्याने पावसाच्या अडथळ्याशिवाय ठरवलेले कार्यक्रम पार पडले. पण पाऊस असता तर आणखी धमाल आली असती, अशी प्रतिक्रियाही तरुणाईकडून व्यक्त करण्यात आली. ‘फ्रेण्डशिप दिना’च्या निमित्ताने काही  हॉटेल्स, आईस्क्रिम पार्लर, पिझ्झा सेंटर आदींनी खास सवलती जाहीर केल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणीही मोठय़ा प्रमाणात गर्दी होती.
‘व्हॉट्स अ‍ॅप’ आणि ‘फेसबुक’वर मैत्री दिनाच्या संदेशांचा पूर आला. या विषयावरील छायाचित्रे, संदेश यांची मोठय़ा प्रमाणात देवाण-घेवाण झाली. अनेक जणांनी मनगटावरील फ्रेण्डशिप बॅण्ड बरोबरच एकमेकांच्या हातावर मनगटापासून ते दंडापर्यंत रंगीत पेनाने ‘मैत्री’ संदेश लिहून आपली हौस भागवून घेतली.