पाठय़वेतन वाढवून मिळावे यासाठी देशभरातील भावी वैज्ञानिकांनी छेडलेले आंदोलन अधिक तीव्र होत असून शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी दिल्लीत रामलीला मैदान ते जंतरमंतपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. याचबरोबर समाज माध्यमांवरूनही आंदोलनाला बळकटी मिळवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
वेळेवर न मिळणारे पाठय़वेतन तसेच पाठय़वेतनातील वाढ या मुद्दय़ांवरून देशभरातील पीएच.डी.चे विद्यार्थी एकत्र आले असून त्यांनी विविध विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांमध्ये आंदोलनास सुरुवात केली आहे. याचबरोबर फेसबुक, ट्विटरसारख्या समाज माध्यमांवरही हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता. तर सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत देशभरातून निषेधाचे ट्विट्स करण्यात आले. या ट्विटची संख्या अडीच हजारांच्या आसपास होती. उद्या साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून दिवसभर देशभरात विविध ठिकाणी निषेध माच्रे काढण्यात येणार आहेत. निषेधासाठी सुरू करण्यात आलेल्या फेसबुक पानावर तसेच ट्विटरवर कार्टून्सच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आहे. तर विविध ठिकाणी कशा प्रकारे आंदोलन सुरू आहे याचा तपशीलही यावर दिला जात आहे.
पंतप्रधानांना १ रुपयाचा धनादेश
पाठय़वेतनाच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नसल्यामुळे बेंगळुरू येथील विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना एक रुपयाचा धनादेश पाठवला आहे. अशा प्रकारचे धनादेश इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांनीही पाठवावेत, असे आवाहनही या विद्यार्थ्यांनी केले आहे.