माहिती तंत्रज्ञानाच्या सध्याच्या काळात भ्रमणध्वनी ही चैनीची नव्हे तर गरजेची वस्तू झाली असून ‘स्मार्ट फोन’मुळे आपल्याला अनेक कामे केवळ एका टिचकीसरशी करता येत आहेत. मराठी वाचन संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी आता याच तंत्रज्ञानाचा आधार घेऊन ‘गोस्टोरीज’ हे अॅप तयार करण्यात आले असून मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याचे प्रकाशन करण्यात आले. मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या कथा या अॅपवर ऐकता येणार आहेत. ‘त्याच गोष्टी एका नवीन माध्यमातून’ अशी शीर्षक ओळ घेऊन हे ‘अॅप’तयार करण्यात आले आहे.
संदीप केळकर यांनी या ‘अॅप’ची निर्मिती केली असून त्यांना नितीश बुधकर व अभिनेत्री-दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. हे अॅप अॅड्रॉईड, आयफोन आणि आयपॅडवर सध्या उपलब्ध करून देण्यात आले असून ते मोफत डाऊनलोड करता येणार आहे. या ‘अॅप’मध्ये विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, मंगला गोडबोले, शं. ना. नवरे, द. मा. मिरासदार, विद्याधर पुंडलिक, प्रिया तेंडुलकर यांच्या कथा आहेत. या कथांचे अभिवाचन अभिनेते अतुल कुलकर्णी, जीतेंद्र जोशी, स्पृहा जोशी, ऐश्वर्या नारकर, ललित प्रभाकर, रोहन गुजर यांनी केले आहे. विशेष म्हणजे आदित्य ओक यांनी या कथांना पुरक असे पाश्र्वसंगीत दिले असून संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचे दिग्दर्शन आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या आजच्या तरुण पिढीपर्यंत मराठीतील उत्तमोत्तम कथा पोहोचवाव्यात, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करावी आणि एकूणच लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन या अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने करण्याच्या उद्देशाने हे ‘अॅप’तयार करण्यात आले असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले. मुंबईत झालेल्या ‘अॅप’प्रकाशन कार्यक्रमास ‘गोष्टी’ना आवाज दिलेले कलाकार आणि सर्व संबंधित उपस्थित होते.
श्रवणाच्या माध्यमातून गोष्टींचा आनंद
कथाकथनाच्या आविष्कारातून ‘मराठी कथा’ पुन्हा एकदा सर्वदूर पोहोचेल आणि गोष्टीवेल्हाळ मराठी रसिकांना, वाचकांना श्रवणाच्या माध्यमातून गोष्टींचा आनंद घेता येईल.
-संपदा जोगळेकर-कुलकर्णी.