पावसाचा जोर नसतानाही वाहतूक विस्कळीत

पावसाचा फारसा जोर नसतानाही रविवारपासून रखडत चाललेली मध्य व हार्बर रेल्वेची सेवा बुधवारीही विस्कळीत होती. संध्याकाळी एल्फिन्स्टन येथे ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूकीला फटका बसला. त्यामुळे सकाळी मध्य रेल्वे व संध्याकाळी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्दजवळ रेल्वे रुळावरील खडी वाहून गेल्याने सकाळी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या मार्गावरील गाडय़ा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. पावसामुळे यापूर्वी कळवा व शीव स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. बुधवारी मध्य रेल्वेवर आसनगाव येथे डाऊन मार्गावर मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याचे निमित्त घडले. एक मार्ग बंद झाल्याने उपनगरीय गाडय़ांची वाहतूक रखडली आणि मग अप गाडय़ांचे वेळापत्रकही कोलमडले. त्यामुळे सकाळी मध्य रेल्वे मार्गावरील गाडय़ा २० ते २५ मिनिटे उशिराने धावल्या.

दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आलेल्या लोकलच्या छतावर चढल्याने एक युवक गंभीर जखमी झाला तर डोंबिवलीला जाणाऱ्या धीम्या लोकलच्या छतावरून तरुण प्रवास करत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून खाली पडला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळेही धीम्या मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

पश्चिम रेल्वेवर एल्फिन्स्टन स्थानकाजवळ संध्याकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने धीम्या डाउन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ही फांदी काढून वाहतूक सुरू होण्यासाठी अर्धा तास लागला. त्यामुळे संध्याकाळी घरी परतत असलेल्या प्रवाशांना खोळंबा झाला. डाउन मार्गामुळे अप धीम्या मार्गावरील गाडय़ाही उशिराने धावत होत्या. संध्याकाळी ६.४५ ते ७.१० वाजण्यादरम्यान विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतूक थांबली होती. मात्र त्यानंतर झाडाची फांदी हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वचे जनसंपर्क अधिकारी गजानन महापूतकर यांनी सांगितले.

१२ जणांचा मृत्यू

मंगळवारी विविध स्थानकांत झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. सीएसटी, कुर्ला डोंबिवली, कल्याण, वडाळा, पनवेल, वांद्रे, अंधेरी, बोरीवली स्थानकांमध्ये विविध अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात १० पुरुष तर २ महिलांचा समावेश आहे.

अतिवृष्टीमुळे रायगडमध्ये दोघांचा मृत्यू

पेण तालुक्यातील ओवे येथील नीलेश कोळी यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. तर श्रीवर्धन तालुक्यातील रानवली येथे खेकडे पकडायला गेलेल्या राकेश नथुराम जाधव (वय ३२) यांचा बुडून मृत्यू झाला. जिल्हय़ात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्हय़ात दोन जणांचा मृत्यू झाला असून १६ घरांची पडझड झाली आहे.  पेण तालुक्यातील गडब परिसरात तसेच उरण तालुक्यातील काही गावांमध्ये उधाणाचे पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला होता. गेल्या चार दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

झाड कोसळल्याने २० विद्यार्थी जखमी

पोलादपूर तालुक्यातील कापडे गावात झाड अंगावर कोसळल्याने २० विद्यार्थी जखमी झाले. वरदायिनी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ही घटना घडली आहे. शाळेतील विद्यार्थी बुधवारी सकाळी पटांगणात प्रार्थनेसाठी एकत्र आले होते. प्रार्थना सुरू असतानाच शाळेच्या पटांगणातील एक जुनाट झाड उन्मळून पडले.यात २० विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्या १६ विद्यार्थ्यांना उपचार करून सोडून देण्यात आले असून गंभीर जखमी झालेल्या चार जणांना माणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले.