रात्र बाजारपेठ प्रस्तावावरील आयुक्तांच्या अभिप्रायास लवकरात लवकर पालिका सभागृहाची मंजुरी मिळावी यासाठी भाजपची धावपळ सुरू असताना शिवसेनेने मात्र ‘आस्ते कदम’ भूमिका घेतली आहे. तूर्तास रात्र बाजारपेठेवरील अभिप्राय मागे ठेवून मित्रपक्षाबरोबर हॉटेल इमारतीच्या गच्चीवरील हॉटेलसाठी वाटाघाटी करून भाजपचा पाठिंबा मिळविण्याची व्यूहरचना शिवसेनेकडून आखण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रस्तावांवरून उभयतांमध्ये सुरू झालेल्या शीतयुद्धाचा समारोप आता वाटाघाटीने होण्याची चिन्हे आहेत.
भाजप नगरसेवक अमित साटम यांनी मुंबईत आठवडाअखेरीस रात्र बाजारपेठ सुरू करण्याची मागणी २०१३ मध्ये ठरावाच्या सूचनेद्वारी केली होती. शहर फेरीवाला समिती याबाबत धोरण निश्चित करेल, असा अभिप्राय देऊन पालिका आयुक्तांनी रात्र बाजारपेठ सुरू करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. हा अभिप्राय मंजुरीसाठी पालिका सभागृहाच्या दोन दिवसांनी होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, हॉटेल इमारतीच्या गच्चीवर हॉटेलला परवानगी देण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावास भाजपने विरोध केल्यामुळे सुधार समितीमध्ये तो नामंजूर झाला होता. त्याचे उपटे काढण्यासाठी शिवसेनेने रात्र बाजारपेठेला कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रात्र बाजारपेठेच्या निमित्ताने चालून आलेल्या संधीचा फायदा घेत इमारतीच्या गच्चीवरील हॉटेलच्या प्रस्तावासाठी भाजपशी वाटाघाटी करण्याचा निर्णय आता शिवसेनेने घेतला आहे.
भाजपबरोबर वाटाघाटींमध्ये यश आल्यास रात्र बाजारपेठ आणि इमारतीच्या गच्चीवरील हॉटेल या दोन्ही प्रस्तावांना सभागृहात संख्याबळाच्या जोरावर मंजुरी मिळविण्याचा शिवसेनेचा विचार आहे. संख्याबळ कमी असले तरी भाजपचे नगरसेवक शिवसेनेपुढे नमण्यास तयार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत रात्र बाजारपेठेला सभागृहाची मंजुरी मिळवून घेण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. पण सभागृहात आयुक्तांचा अभिप्राय मागे ठेवून भाजपला तूर्तास शह देत नंतर वाटाघाटी करून प्रश्न सोडविण्याचा शिवसेनेचा इरादा आहे.