नोटबंदीचा निर्णय घेऊन मोदी सरकार सामान्य जनतेच्या खिशातील पैसा काढून घेत आहे. नरेंद्र मोदी हा पैसा उद्योगपतींच्या घशात घालणार आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. त्यांनी बुधवारी भिवंडी न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी मोदी सरकारच्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकार हे केवळ काही उद्योगपतींच्या हितासाठी काम करत आहे. गेल्या वर्षभरात सरकारने १५ उद्योगपतींची मिळून १ लाख १० हजार कोटींची कर्जे माफ केली आहेत. त्यामुळे आता ही तूट भरून काढण्यासाठी सामान्यांच्या खिशातून बँकेत आलेल्या पैशांचा वापर केला जाईल, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. नोटबंदीच्या निर्णयामागे देशातील काळ्या पैशाला चाप लावण्याचे कारण सरकारकडून सांगितले जाते. मात्र, सध्या देशभरात बँकेसमोर लागणाऱ्या रांगेत श्रीमंत व्यक्ती दिसतात का, असा सवाल राहुल यांनी विचारला. काळ्या पैशांविरुद्ध खरोखरच कारवाई करायची असेल तर प्रथम नरेंद्र मोदी ज्यांच्या खासगी विमानाने प्रवास करतात, त्यांच्याविरुद्ध कारवाई करा. काँग्रेस या सगळ्याविरुद्ध लढा देत असून काही झाले तरी या लढाईतून आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, असे राहुल यांनी सांगितले.

तसेच देशात सध्याच्या घडीला स्वातंत्र्य आणि गुलामगिरीची अशा दोन विचारधारा अस्तित्वात आहेत. गुलामगिरीच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना देशाला झुकवायचे आहे. मात्र, त्यांना अजून भारताची ताकद समजलेली नाही. देशावर राज्य करू इच्छिणाऱ्या या लोकांविरुद्ध मी लढा देत आहे. महात्मा गांधींच्या विचारांवर विश्वास असल्यामुळेच मी आज न्यायालयात आलो. मी आज खूष आहे, मला लढल्याचा आनंद मिळत आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दाखल करण्यात आलेल्या अवमान खटल्याच्या सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात आले होते. यावेळी न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला असून याप्रकरणाची पुढील सुनावणी २८ जानेवारीला होणार आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या मुंबईतील आगमनाच्या पार्श्वभूमीवर राज्य काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. राहुल यांच्या वांद्रे ते भिवंडी या प्रवासादरम्यान मुंबईत तीन ठिकाणी, ठाणे शहराच्या सीमेवर तसेच भिवंडीमध्ये राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या हत्येत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा हात असल्याचा आरोप राहुल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भिवंडीत झालेल्या प्रचारसभेत केला होता. यावरून  संघाच्या एका स्थानिक  नेत्याने राहुल गांधी यांच्याविरोधात अवमानाचा खटला दाखल केला होता.

 

 

Live Updates
11:32 (IST) 16 Nov 2016
काँग्रेस लढ्यातून एक इंचही मागे हटणार नाही- राहुल गांधी
11:32 (IST) 16 Nov 2016
उद्योगपतींची कर्जे माफ करण्यासाठी सामान्य जनतेचे पैसे वापरले जाणार- राहुल गांधी
11:31 (IST) 16 Nov 2016
लोकांच्या खिशातून पैसे काढून मोदी उद्योगपतींना देणार- राहुल गांधी
11:31 (IST) 16 Nov 2016
बँकेच्या रांगेत श्रीमंत व्यक्ती दिसतात का?; राहुल गांधींचा सवाल
11:31 (IST) 16 Nov 2016
जो व्यक्ती सरळ उभा राहतो त्याला कोणीही गुलाम बनवू शकत नाही- राहुल गांधी
11:31 (IST) 16 Nov 2016
मी ज्यांच्याशी लढत आहे त्यांना देशावर राज्य करायचे आहे- राहुल गांधी
11:30 (IST) 16 Nov 2016
देशात सध्या स्वातंत्र्य आणि गुलामीची दोन विचारधारा अस्तित्वात- राहुल गांधी
11:27 (IST) 16 Nov 2016
मी आज खूप खुष आहे , मला लढल्याचा आनंद मिळत आहे- राहुल गांधी
11:26 (IST) 16 Nov 2016
गांधींजीच्या विचारांसाठी मी न्यायालयात आलो- राहुल गांधी
11:25 (IST) 16 Nov 2016
राहुल गांधींच्या भाषणाला सुरूवात
11:23 (IST) 16 Nov 2016
राहुल गांधी भिवंडीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार; थोड्याचवेळात भाषणाला सुरूवात
11:17 (IST) 16 Nov 2016
शिवराज पाटील यांच्या वैयक्तिक हमीवर राहुल यांना जामीन
10:36 (IST) 16 Nov 2016
भिवंडी न्यायालयाच्या परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
10:35 (IST) 16 Nov 2016
राहुल गांधी भिवंडी न्यायालयात दाखल
09:36 (IST) 16 Nov 2016
'संघर्ष करो हम आपके साथ है'; राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणा
09:03 (IST) 16 Nov 2016
न्यायालयीन सुनावणी पार पडल्यावर भिवंडीतील कार्यकर्त्यांना गांधी मार्गदर्शन करणार
09:03 (IST) 16 Nov 2016
मुंबईत तीन ठिकाणी, ठाणे शहराच्या सीमेवर तसेच भिवंडीमध्ये राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत केले जाणार
09:02 (IST) 16 Nov 2016
भिवंडी न्यायालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त