‘लोकसत्ता’ने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनातून सुरू केलेला महाराष्ट्रातील नवीन वक्त्यांचा शोध दुसऱ्या टप्प्यात पोहोचला असून, आता विभागीय अंतिम फेऱ्यांची धूम सुरू झाली आहे. पुणे, रत्नागिरी विभागाची अंतिम फेरी पार पडल्यानंतर आता इतर सहा केंद्रांवरील अंतिम फेऱ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. मुंबई आणि ठाणे येथील विभागीय अंतिम फेरी अनुक्रमे मंगळवारी (३ फेब्रुवारी) आणि बुधवारी (४ फेब्रुवारी) रंगणार आहे. प्राथमिक फेरीचे आव्हान यशस्वीरीत्या पार केलेल्या मुंबई केंद्रावरील सात, तर ठाणे केंद्रावरील नऊ स्पर्धकांमध्ये ही अंतिम लढत रंगणार आहे. ‘नाथे समूह’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफाइस’च्या सहकार्याने ‘लोकसत्ता’ने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी आयुर्विमा महामंडळ, जनकल्याण बँक आणि तन्वी हर्बल यांचे सहकार्य मिळाले आहे.
या फेरीसाठी स्पर्धकांना नव्याने विषय देण्यात आले आहेत. समाजकारण, राजकारण, साहित्य, माध्यमे यांना स्पर्श करणाऱ्या, तरीही रोजच्या जगण्याशी संबंध असलेल्या, विचाराला चालना देणाऱ्या विषयाची मांडणी करण्याच्या आव्हानाला स्पर्धकांना सामोरे जायचे आहे. विषयाचे सादरीकरण, भाषेचे सौंदर्य आणि समर्पक वापर, आशय, परिणाम, शैली अशा मुद्दय़ांच्या आधारे परीक्षण करण्यात येणार आहे. या फेरीत अव्वल ठरलेले स्पर्धक राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत दाखल होतील.

रत्नागिरी विभागात आदित्य कुलकर्णीची सरशी
‘लोकसत्ता’तर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पध्रेसाठी रत्नागिरी विभागातून डीबीजे महाविद्यालयाच्या (चिपळूण) आदित्य कुलकर्णी याने प्रथम क्रमांक पटकावत महाअंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (रत्नागिरी) हर्षद तुळपुळेने द्वितीय आणि घरडा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (लवेल-खेड) श्रीया पटवर्धनने तृतीय क्रमांक मिळवला. त्याचबरोबर प्रणव माळी (आर. सी. काळे कॉलेज, चिपळूण) व चिन्मयी मटांगे (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ प्रा. डॉ. विश्राम ढोले, आकाशवाणीचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी सुहास विद्वांस आणि नीला पालकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
औरंगाबाद येथील विभागीय अंतिम फेरी सोमवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी रंगणार असून यावेळी गणेश राऊत स्पर्धकांना ‘इतिहासाचे वर्तमान’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच, नागपूर येथील विभागीय अंतिम फेरीही सोमवार, २ फेब्रुवारी रोजी रंगणार असून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभय टिळक ‘संतवाङ्मयाचे समकालिनत्व’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

मुंबई-ठाणे विभागीय अंतिम फेरीच्या प्रवेशिका आजपासून उपलब्ध
मुंबई
*कधी : मंगळवार, ३ फेब्रुवारी, सायंकाळी ५ वाजल्यापासून
*कुठे : सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर
*मार्गदर्शक : ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आणि नाटककार प्रशांत दळवी यांचे स्पर्धकांसाठी ‘वक्तृत्वाचे प्रयोग’ या विषयावर व्याख्यान  
*प्रवेशिका : या कार्यक्रमाच्या प्रवेशिका रविवारपासून कार्यक्रमस्थळी सकाळी ८ ते ११.३० व सायंकाळी ५ ते ८.३० या वेळेत उपलब्ध  
ठाणे
*कधी : बुधवार, ४ फेब्रुवारी, सायंकाळी ५ वाजल्यापासून
*कुठे : शेठ एनकेटीटी महाविद्यालय सभागृह, सीकेपी सभागृहाजवळ, खारकर आळी, ठाणे (प.)
*मार्गदर्शक : सूत्रसंचालक धनश्री लेले यांचे स्पर्धकांसाठी ‘सूत्रसंचालनातील गमतीजमती’ या विषयावर व्याख्यान
*प्रवेशिका : रविवारपासून ‘लोकसत्ता’ ठाणे कार्यालय, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले मार्ग, नौपाडा, ठाणे (प.) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध