लोकसत्ता लोकांकिकोच्या चौथ्या पर्वाला लवकरच सुरुवात

रंगभूमी आणि सर्जनशीलतेचे नाते अनोखेच. रंगमंचावर पाऊल ठेवताक्षणीच सगुण साकार होणारा प्रतिभाविष्कार ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवावा असा असतो. हे जिवंत क्षण अनुभवायचे तर नवनिर्मितीचा हा अंगार तरुण मनामनांतही चेतवायला हवा. गेली तीन वर्षे राज्यभरातील तरुणाईला साद घालत त्यांच्याक डून नवनिर्मितीचा हा नाटय़प्रयोग करून घेण्याचे काम ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरराज्यीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून नेटाने सुरू आहे. यंदाही ‘लोकांकिका’च्या चौथ्या पर्वाचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून, अल्पावधीतच नाटय़विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या या एकांकिका स्पर्धेचा पडदा लवकरच उलगडणार आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालयीन नाटय़वेडय़ांना आपले कलागुण नाटय़विश्वातील नामवंतांसमोर दाखवण्याची संधी देणारा ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘झी युवा’ आणि ‘केसरी टूर्स’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, रत्नागिरी या केंद्रांवरून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेंट हंट पार्टनर म्हणून काम पाहणार आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा ही नाटय़वर्तुळातही चर्चेचा विषय ठरली ती त्याच्या आगळ्यावेगळ्या स्वरूपामुळे. केवळ महाविद्यालयीन लेखक, कलावंत, बॅकस्टेजला धडपडू पाहणाऱ्या नाटय़वेडय़ांना रंगभूमीवर आपल्या प्रतिभेचा आविष्कार साकारण्याची संधी देणे एवढाच या स्पर्धेचा मर्यादित हेतू नाही. एकांकिके च्या माध्यमातून थेट नामवंतांसमोर आत्मविश्वासाने आपली कला सादर करणाऱ्या या तरुण कलाकारांना थेट त्यांच्या क्षेत्राची कवाडे खुली करून देण्याची संधीही या स्पर्धेने दिली आहे. स्पर्धा सुरू होऊन उणीपुरी तीन वर्षे झाली असून, या कालावधीत ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरून हेरलेले असे अनेक गुणवंत कलाकार आज मालिका, नाटक आणि चित्रपट क्षेत्रांत कार्यरत आहेत. पहिल्याच संधीत थेट अभिनयक्षेत्रात काम करण्याची संधी देणारी, नाटक-चित्रपट-मालिका क्षेत्रांतील प्रस्थापित कलाकारांकडून तरुणाईला सहज मार्गदर्शन मिळवून देणारी ही स्पर्धा म्हणूनच वैशिष्टय़पूर्ण ठरली आहे.

राज्यभरातील दूरदूरच्या शहरांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे, त्यांच्या विचारांचे, त्यांच्या विषयांचे, त्यांच्या नाटय़ात्मक मांडणीचे अस्सल प्रतिबिंब आजवर या स्पर्धेतून उमटलेले पाहायला मिळाले आहे. पहिल्याच वर्षी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत २००हून अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेऊन उत्स्फू र्त प्रतिसाद दिला होता. हा प्रतिसाद आत्तापर्यंत पार पडलेल्या प्रत्येक स्पर्धेत पाहायला मिळाला आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या सर्व विभागांतून होणारी प्राथमिक फेरी, त्यातून निवडल्या जाणाऱ्या एकांकिकांची अंतिम फेरी आणि प्रत्येक विभागातून अंतिम फेरीत निवडून आलेल्या एकांकिकांमध्ये महाअंतिम सोहळा रंगतो. रंगमंचावरच्या या सर्जनशीलेतून ‘लोकसत्ता लोकांकिका’चा मान या तरुणाईला मिळवायचा असतो. याही वर्षी तोच सळसळता उत्साह, तोच दर्जा, मूल्य आणि प्रतिभेचा अत्युच्च आविष्कार घेऊन ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरराज्यीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेने तुम्हाला साद घातली आहे.. आता तयारीला लागा!