प्रभादेवीत बुधवार, गुरुवारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’

करिअरचा मार्ग आखायची तयारी बारावीनंतर सुरू होते. बारावीत गेल्यानंतरच हा प्रश्न विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने सतावतो. याच टप्प्यावर आवश्यक असते, तज्ज्ञांचे मार्गदर्शन. म्हणूनच ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, ३१ मे आणि १ जून रोजी सकाळी ९ ते ५ या कालावधीत रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे ही कार्यशाळा होणार आहे.

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या दोन अभ्यासक्रमांकडे विद्यार्थी आणि पालकांचा अधिक कल असतो. पण या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ आणि ‘जेईई’ या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांची काठिण्यपातळी, पेपर सोडवायच्या पद्धती याबद्दल महाराष्ट्रातल्या विद्यार्थी आणि पालकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळेच या परीक्षा उगाचच मनात भीती निर्माण करतात. याच परीक्षांतील यशाचे गुपित सांगणार आहेत, तज्ज्ञ शिक्षक डॉ. कुर्वे आणि प्रा. काटदरे, प्रा. नेरकर आणि प्रा. मयूर मेहता.

करिअर निवडीसाठी विद्यार्थी आणि पालकांनाही समुपदेशन आवश्यक असते. म्हणूनच करिअर समुपदेशक विवेक वेलणकर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. ते उच्चशिक्षणातील वाटांची माहितीही विद्यार्थ्यांना देतील. पालकांच्या अपेक्षा, अभ्यासाचे दडपण या सगळ्यांतून मार्ग काढत यश मिळवण्याचा एक मोठाच ताण विद्यार्थ्यांवर असतो. या ताणाचे नियोजन कसे करावे, याचा कानमंत्र देणार आहेत, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. राजेंद्र बर्वे.

बीए, बीकॉम, बीएस्सी अशा मळलेल्या वाटांपलीकडेही किफायतशीर करिअरचे क्षितिज आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात तर हे वेगळ्या वाटांवरील करिअर अधिकच उपयुक्त ठरत आहे. म्हणूनच ‘करिअरच्या वेगळ्या वाटा’ या चर्चासत्रातून विविध विषयांतील तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतील. ‘डिजिटल मीडिया’ आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक झाला आहे. या क्षेत्रात करिअरच्या अमाप संधी आहेत. गेली १०-१५ वर्षे ‘डिजिटल मीडिया’मध्येच काम करणाऱ्या धनश्री संत या डिजिटल मीडियातज्ज्ञ या वाटांची ओळख करून देतील. जाहिराती आपल्याला पावलोपावली भेटत असतात. पण या क्षेत्रात करिअर कसे घडवायचे याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील, याच क्षेत्रातील उच्चपदस्थ अभिजित करंदीकर. खेळामध्ये आहारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट यांच्यासाठीही अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याविषयी माहिती देतील, शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या वर्षां उपाध्ये तसेच मल्लखांब आणि योगासनांतील राष्ट्रीय खेळाडू आणि क्रीडामानसोपचारतज्ज्ञ नीता ताटके. आरजे असोत वा व्हॉइसओव्हर आर्टिस्ट. आवाजातील करिअरची भुरळ अनेकांना पडतेय. याच क्षेत्रात गेली १७ वर्षे काम करणाऱ्या आरजे रश्मी वारंग याविषयी माहिती देतील. या करिअर कार्यशाळेत दोन्ही दिवस सारखेच विषय आणि वक्ते असतील. तसेच सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

अश्विनी भिडे, प्रवीण दराडे यांचे मार्गदर्शन

मुंबई मेट्रो रेल कॉपरेरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) सहआयुक्त प्रवीण दराडे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.स्पर्धा परीक्षांची तयारी याबाबत दराडे हे ३१ मे रोजी तर भिडे या १ जून रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

प्रवेशिका कुठून मिळवाल?

  • प्रत्येक दिवसाचे ५० रु. इतके शुल्क भरून प्रवेशिका मिळतील. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत खालील ठिकाणी प्रवेशिका मिळतील.
  • लोकसत्ता कार्यालय – दुसरा मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
  • रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी
  • विद्यालंकार क्लासेस- विद्यालंकार हाऊस, प्लॉट नं. ५६, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर (पूर्व)
  • यासोबत ऑनलाइन प्रवेशिकाही उपलब्ध आहेत.
  • https://www.townscript.com//e/loksatta-marga-yashacha-mumbai-001230

प्रायोजक

  • अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई हे या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर आहेत, तर विद्यालंकार आणि एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे हे असोसिएशन पार्टनर असून ‘सपोर्टेड बाय’चे पार्टनर्स आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स आहेत. युक्ती, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट, लक्ष्य अॅकॅडमी, अरेना अॅनिमेशन, आदित्य ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, आयडीईएमआय, मराठा मंदिर बाबासाहेब गावडे इन्स्टिटय़ूटस, रिलायन्स एज्युकेशन, सासमिरा, श्रीनिवासन्स आयआयटी अॅकॅडमी हे या कार्यशाळेचे ‘पॉवर्ड बाय पार्टनर’ आहेत.