विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) विधेयक आज एकमताने मंजूर झाले. तीन दिवस चाललेल्या या अधिवेशनात विरोधक व सरकारमध्ये या विषयावर चर्चा झाली. विरोधकांनी जीएसटीतील तरतुदींवरून सरकारवर टीकेची तोफ डागली होती. सरकारनेही या विधेयकाबाबत विरोधकांसह युतीतील शिवसेनेच्या सदस्यांच्याही शंकेला उत्तर दिले. अखेर आज (सोमवार) जीएसटी संबंधीचे तिन्ही विधेयक एकमताने मंजूर झाले. विरोधकांनी जीएसटीला पाठिंबा दिला. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हे विधेयक मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाचे आभार मानले.

जीएसटीमुळे राज्याचे सर्वाधिक नुकसान होणार असून उत्तर प्रदेशला या कायद्याचा सर्वात जास्त फायदा होणार असल्याची टीका विरोधकांनी केली होती. राज्याला सोसाव्या लागणाऱ्या नुकसानीची अधिकाधीक भरपाई कशी मिळेल, याकडे लक्ष देण्याची मागणी माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली होती. नोटाबंदीचे परिणाम जाणवत असतानाच जीएसटीमुळे राज्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना देण्यात येणाऱ्या मुदतीत ३२ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत वाढ केली. पण हे करताना केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा वाटा वाढवला. परिणामी या वाढीचा काहीच उपयोग झालेला नाही. जीएसटीची नुकसानभरपाई ४२ टक्के रकमेच्या कक्षेच्या बाहेर राहील या दृष्टीने खबरदारी घेण्याची मागणीही पाटील यांनी या वेळी केली होती. विधानसभेनंतर विधान परिषदेतही जीएसटी विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.

कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा
संघर्षयात्रेच्या वेळी जळगावला विरोधी नेते गेले असता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी चहापानाला बोलाविले. त्यांनी स्वत: उपस्थित राहून विरोधकांचे आगतस्वागत केले. नाथाभाऊंना विरोधी नेत्यांबद्दल प्रेम आहे. यामुळेच त्यांनी विरोधी नेत्यांचे स्वागत केले, असे सांगत जयंत पाटील यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर आपण तेथे उपस्थित होतो हे सांगतानाच खडसे यांनी, कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा, असे उदगार काढल्याने सारेच अवाक् झाले. त्यावरून जोरदार चर्चा सुरू होती.