सुटीच्या दिवशी कामावर येणाऱ्या पोलिसांना मिळणाऱ्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता त्यांना एक दिवसाच्या वेतनाएवढे मानधन दिले जाणार आहे. गेल्या ११ वर्षांपासूनची पोलिसांची मागणी होती. सध्या सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या पोलिसांना ५८ ते १०५ रुपये मिळत होते. त्यात आता ४९० ते ९०२ रुपयांची वाढ होणार असून सुमारे २.०६ लाख पोलिसांना याचा फायदा होणार आहे. सायबर गुन्हय़ांवर नियंत्रण आणण्यासाठी सुमारे एक हजार तज्ज्ञ पोलिसांची सायबर तुकडी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सोनसाखळी खेचण्याच्या वाढत्या घटनांची दखल घेऊन अशा घटना दरोडा ठरविण्यात येणार असून त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.
 विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य सदस्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. गेल्या चार महिन्यांत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा विरोधकांचा दावा खोटा असून उलट राज्यातील गुन्हे कमी झाले. गुन्हे शाबित होऊन आरोपींना होणाऱ्या शिक्षेच्या प्रमाणात ११ वरून २८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यात आणि आरोपी सुटण्यात महाराष्ट्रात प्रमाण अधिक आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी चांगले वकील देण्याबरोबरच सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होणाऱ्या खटल्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी छाननी समिती तसेच पंच हा सरकारी अधिकारीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराची नोंद घेण्यासाठी तसेच त्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोनसाखळी चोरी आता दरोडय़ाचा गुन्हा
सोनसाखळी चोरण्याचे वाढते प्रकार ही गंभीर बाब आहे. यापुढे अशा घटना हा दरोडय़ाचा प्रकार ठरवून तसे गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यासाठी दंड संहितेच्या कलम ३९२मध्ये सुधारणा करून ३९२अ हे नवीन कलम समाविष्ट करण्यात येणार आहे. राज्यातील नेते किंवा देवदेवतांच्या विटंबना करणारी छात्राचित्रे इंटरनेटच्या माध्यमातून परदेशातून अपलोड केली जातात. अशा आक्षेपार्ह पोस्टवर नियंत्रण ठेवणारी व्यवस्था सध्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून या संस्थेची शाखा मुंबईत सुरू करण्याची विनंती केंद्रास करण्यात आली असून त्यांनीही त्यास होकार दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.