कोटय़वधी रुपयांच्या एमडी या अमली पदार्थासह पकडण्यात आलेल्या पोलीस शिपाई धर्मराज काळोखे याने चौकशीत मुंबईतील काही बडय़ा पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेतली असून या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठीच या शिपायावर मुंबईत गुन्हा दाखल करून सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतल्याचे दाखविले, असा आरोप राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. ही गंभीर बाब असून याची माहिती घेऊन निवेदन करू तसेच आवश्यक असल्यास स्वतंत्र अधिकारी नेमून चौकशी करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सातारा येथील काळोखे याच्या घरात ११२ किलो एमडी या अमली पदार्थाचा साठा सापडल्यानंतर काळोखे याने चौकशीत मुंबईतील बडय़ा पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेतल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
एक पोलीस शिपाई एवढा मोठा अमली पदार्थाचा व्यवहार करू शकत नाही. त्याला कोणत्या तरी बडय़ा अधिकाऱ्यांची साथ असणार असे सांगत काळोखे याच्यावर दबाव आणण्यासाठी मरिन ड्राईव्ह येथील पोलीस ठाण्यातील त्याच्या ड्रॉवरमध्ये बारा किलो एमडीची पावडर मिळाल्याचे दाखविण्यात आले. मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे जयंत पाटील म्हणाले. त्याने बडय़ा पोलिसांची नावे जाहीर करू नये यासाठीच त्याच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही पाटील यांनी केला.