आर्थिक राजधानी, मायानगरी अशी अनेक विशेषणे चिकटलेली मुंबई वृक्षसंपत्तीनेही तितकीच संपन्न आहे. इतकी की मुंबईत अनेक दुर्मिळ वृक्ष गेली कित्येक वर्षे ऐटीत उभी आहेत. यापैकीच एक सायनच्या डोंगरावर गेली ५० वर्षे ताठ उभा असलेला ‘कृष्णगरू’. हे झाड भारतात मुंबईसह केवळ काश्मीरमध्येच आहे. कृष्णगरूसारख्या एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ७० दुर्मिळ वृक्षांविषयीची महिती लवकरच वाचकांच्या भेटीला पुस्तक रूपाने येणार आहे.
मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘सफर.. मुंबईच्या वृक्षतीर्थाची’ या पुस्तकात मुंबईतील अनेक दुर्मिळ वृक्षांची ओळख मुंबईकरांना करून देण्यात आली आहे. यात वृक्षांची उपयुक्तता, त्यांचा औषधी कारणांकरिता होणारा वापर अशी विविध वैशिष्टय़ेही उलगडण्यात आली आहेत. मुंबईत आढळणारी ही झाडे अतिशय दुर्मिळ असून त्यांच्या जाती इतर राज्यातही नाहीत. प्रत्येक वृक्षाचे त्याच्या स्थानिक नावासोबत संस्कृत, इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील नावेही देण्यात आली आहे. स्थानिक भाषेत एकाच वनस्पतीला सारखीच नावे वापरली जातात. त्यामुळे हा गोंधळ टाळण्याकरिता वृक्षांची शास्त्रीय नावे देण्यात आली आहेत.
पुस्तकात मेणबत्त्याचं झाड, लांबत्या शेपटय़ाचे झाड, अगडबंब, पिचकारी, पण खोटा, काळा डमर अशा विविध दुर्मिळ झाडांची माहिती देण्यात आली आहे. या सचित्र पुस्तकात वृक्षांच्या छायाचित्रांवरून त्यांची ओळख पटण्यास मदत होते. जिजामाता भोसले उद्यानात दुर्मिळ वृक्ष आहेत. त्यांची माहितीही यात देण्यात आली आहे. हे पुस्तक उपयोगी पडणार असल्याची माहिती लेखक प्रकाश काळे यांनी दिली. या पुस्तकाच्या लेखनासाठी वनस्पतीशास्त्रावरील आधुनिक आणि दुर्मिळ ग्रंथाचा अभ्यास काळे यांनी केला.
वैशिष्टय़पूर्ण कृष्णगरू
मुंबईतील कृष्णगरू हा वृक्ष दुर्मिळ तर आहेच, परंतु, अनेक वैशिष्टय़ांनीही समृद्ध आहे. या वृक्षाचा सुगंधीपणा हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे त्याला येणारी बुरशीही अत्यंत मौल्यवान आहे. त्याच्या बियांपासून निघणाऱ्या तेलाचाही सुंगधी द्रव्यात वापर केला जातो. सायनच्या डोंगरावर वसलेल्या या झाडावर प्रयोग सुरू आहेत.