आपल्या नाटय़कृतींनी जागतिक रंगभूमीवर आणि काळावर मात करणाऱ्या विल्यम शेक्सपिअरच्या नाटकांवर आधारित चित्रपटांचा ‘पट’ पुस्तकरुपी उलघडणार आहे. येत्या २३ एप्रिलला शेक्सपिअरच्या ४०० व्या पुण्यतिथीला ‘शेक्सपिअर आणि सिनेमा’ हे पुस्तक ‘मौज प्रकाशन गृह’तर्फे प्रकाशित केले जात आहे. शेक्सपिअरच्या ३८ सर्वश्रेष्ठ नाटकांवर चारशेहून अधिक चित्रपटाची निर्मिती झाली आहे. यावेळी नाटक आणि चित्रपट या परस्परविरोधी भासणाऱ्या कलांच्या साम्यभेदांचा तौलानिक वेध या ग्रंथात लेखक विजय पाडळकर यांनी घेतला आहे.
शेक्सपिअरच्या कलाकृतींवर आधारित गेल्या शंभर वर्षांंतील चित्रपटांच्या इतिहासाचा संक्षिप्त आढावा ‘ शेक्सपिअर आणि सिनेमा’ या पुस्तकात घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे दिग्दर्शक शेक्सपिअरच्या कलाकृतींना कसे हाताळतात. विशेषत: ‘मॅकबेथ’ आणि ‘किंग लिअर’ या शोकात्म नाटकांटवर आधारित चित्रपटांचा विचारही करण्यात आला आहे. शेक्सपिअरच्या साहित्यातील आशयसुत्रांची मांडणी नाटककारांनी कशी केली आणि सिनेदिग्दर्शकांनी त्याचा विकास कसा केला? याचा समग्र आढावा यात घेण्यात आला आहे.
शेक्सपिअरच्या नाटकांची सर्वसाधारणपणे तीन विभागात विभागणी केली जाते. त्याच्या ३८ नाटकांपैकी १० ऐतिहासिक नाटके आहेत. १६ सुखात्मिका तर १२ शोकात्म नाटके आहे.
त्यातील नाटक आणि चित्रपट, शेक्सपिअरच्या चित्रीकरणाचा इतिहास-मूकपटात शेक्सपिअर, बोलपट आणि शेक्सपिअर, द ट्रॅजिडी ऑफ मेकबेथ, कुरोसावाचा थ्रोन ऑफ ब्लड, रोमन पोलान्स्कीचा मॅकबेथ, किंग लिअर हे विशेष मानले जातात. त्याचाच धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
शेक्सपिअरच्या नाटकांवर जगभरच्या भाषेत चारशेहून अधिक चित्रपट झाले आहेत. यातले अनेक चित्रपट पाहिले. यासाठी मी न्युयॉर्कच्या सेंट्रल ग्रंथालय आणि टेंपल युनिव्हर्सिटीतील अनेक संदंर्भ चाळले आहे. यातून वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे दिग्दर्शक कसा वेध घेऊ पाहत होते, याचा विचार ‘शेक्सपिअर आणि सिनेमा’ या पहिल्या खंडात केला आहे. दुसऱ्या खंडात ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’ आणि ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ या तीन शोकात्मिकांचा विचार केला जाणार आहे.
-विजय पाडळकर, लेखक