आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर येण्याबाबत मंत्रालयाच्या नोकरशाहीमध्ये साशंकता आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या सचिवांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मनासारख्या बदल्या करून घेतल्या आहेत वा बदल्यांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप आणि शिवसेनेने निर्भेळ यश प्राप्त केले. विधानसभा निवडणुकीत असाच कल जसाच्या तसा राहण्याची शक्यता नसली तरी आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येण्याबाबत साशंकताच व्यक्त केली जाते. याची पहिली चाहूल मंत्र्यांच्या सचिवांना लागलेली दिसते. कारण गेले तीन-चार दिवस मंत्रालयात मंत्र्यांच्या सचिवांनी आपल्याला हव्या त्या जागेवर बदल्या करून घेण्यावर भर दिला आहे.
अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम बघितलेले संजय यादव हे अलीकडेच परदेशात प्रशिक्षणासाठी गेले. मुख्यमंत्री कार्यालयातील एका उपसचिवानेही बदली करून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातील ‘सर्वेसर्वा’ सुरेश जाधव यांची पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. अजितदादांच्या कार्यालयातील अन्य काही सचिवांच्या बदल्या येत्या एक-दोन दिवसांत होणार असल्याचे सांगण्यात येते. गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे खासगी सचिव सूर्यकांत पालांडे यांचीही मुद्रांक नोंदणी विभागात बदली झाली. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचे खासगी सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंम्डवार यांची मुद्रांक नोंदणी विभागात बदली करण्यात आली. आणखी काही मंत्र्यांचे खासगी सचिव आणि सचिव स्वत:च्या बदल्या करून घेण्यासाटी धावपळ करीत आहेत.
सचिव म्हणून चांगली मदत झाल्यानेच मंत्रीही आपापल्या सचिवांना चांगल्या पदांवर नियुक्ती मिळावी म्हणून आग्रगी आहेत. जून महिन्यानंतर साऱ्या बदल्यांचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. परिणाम सध्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मंत्र्यांचे सचिव आणि विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे ढीगभर प्रस्ताव दाखल झाले आहेत.