मुंबईतील गोकुळ निवास इमारतीला लागलेली आग शमविताना मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन अधिकाऱ्यांना शहीद जवानांचा दर्जा देण्यात येणार असून त्याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. 

तसेच या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना नवीन सरकारी घर मिळेपर्यंत आहे तेथेच राहण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी दिली.
काळबादेवी भागातील गोकुळ निवास या इमारतीला ९ मे रोजी लागलेली आग विझवताना महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर, उपप्रमुख सुधीर अमीन, साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे, केंद्राधिकारी महेंद्र देसाई या चार अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या अधिकाऱ्यांना शहीद जवानांचा दर्जा देऊन त्यांच्या वारसांना शासकीय फायदे व सवलती लागू करण्याची मागणी केली जात होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या जवानांना शहिदांचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज याच मुद्दय़ावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेची, महापालिकेची तसेच मुंबईकरांची भूमिका त्यांच्यासमोर मांडली. या चारही अधिकाऱ्यांना शहीद जवानांचा दर्जा देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असे कदम यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
राष्ट्रपतींच्या शौर्य पदकासाठी या चारही अधिकाऱ्यांची केंद्रास शिफारस करण्यात येणार असून मुख्यमंत्री कोटय़ातून त्यांच्या कुटुंबीयांना सदनिका देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. मात्र सध्या या धोरणावर न्यायालयाची स्थगिती असल्याने सरकारकडून घर मिळेपर्यंत या कुटुंबीयांना तेथेच राहण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च महापालिकेने उचलावा, असे आदेशही देण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.