प्रभादेवीत उद्या, परवा ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळा; ‘एमएमआरडीए’चे सहआयुक्त प्रवीण दराडे यांच्या हस्ते उद्घाटन

दहावीपर्यंत काहीसा धूसर वाटणारा करिअरचा मार्ग बारावीनंतर पुरता स्पष्ट होतो. नव्हे तो करावाच लागतो. म्हणूनच हा टप्पा करिअरमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो. इथेच आवश्यक असते, तज्ज्ञांचे मार्गदर्शन. म्हणूनच ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ३१ मे आणि १ जून रोजी सकाळी ९ ते ५ या कालावधीत रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे ही कार्यशाळा होणार आहे. ३१ मे रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहआयुक्त प्रवीण दराडे या कार्यशाळेचे उद्घाटन करतील तसेच विद्यार्थ्यांशी संवादही साधतील. तर १ जूनला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी हे विद्यार्थी आणि पालकांमधील लोकप्रिय अभ्यासक्रम. पण या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अनुक्रमे ‘नीट’ आणि ‘जेईई’ या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांची काठिण्यपातळी, पेपर सोडवायच्या पद्धती याबद्दल आजही अनेक विद्यार्थी आणि पालकांना पुरेशी माहिती नसते. त्याविषयीच महिती देण्यासाठी डॉ. कुर्वे, प्रा. काटदरे, प्रा.भट आणि प्रा. नेरकर हे तज्ज्ञ शिक्षक येणार आहेत.

करिअर निवडीचा अवघड टप्पा कसा पार पाडावा, याविषयी करिअर समुपदेशक विवेक वेलणकर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. ते उच्चशिक्षणातील वाटांची माहितीही देतील. पालकांच्या अपेक्षा, अभ्यासाचे दडपण, कधी न आवडलेला अभ्यासक्रम या सगळ्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर प्रचंड ताण निर्माण होत असतो. या ताणाचे नियोजन कसे करावे, याचा कानमंत्र देणार आहेत, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. राजेंद्र बर्वे.

मळलेल्या वाटांपलीकडच्या करिअरच्या क्षितिजाची ओळख करून दिली जाईल, करिअरच्या वेगळ्या वाटा या चर्चासत्रातून. ‘डिजिटल मीडिया’ आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक झाला आहे. गेली १०-१५ वर्षे ‘डिजिटल मीडिया’मध्येच काम करणाऱ्या धनश्री संत या डिजिटल मीडियातज्ज्ञ या वाटांची ओळख करून देतील. जाहिराती आपल्याला पावलोपावली भेटत असतात. पण या क्षेत्रात करिअर कसे घडवायचे याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील, याच क्षेत्रातील उच्चपदस्थ अभिजित करंदीकर. खेळामध्ये आहारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट यांच्यासाठीही अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याविषयी माहिती देतील, शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या वषा उपाध्ये तसेच मल्लखांब आणि योगासनांतील राष्ट्रीय खेळाडू आणि क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ नीता ताटके. तर आरजे रश्मी वारंग आवाज आणि त्या संदर्भातील मधुर करिअरची माहिती करून देतील. गेली १७ र्वष या क्षेत्रात असलेला त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

या करिअर कार्यशाळेत दोन्ही दिवस सारखेच विषय आणि वक्ते असतील. तसेच सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

प्रवेशिका कुठून मिळवाल?

’ प्रत्येक दिवसाचे ५० रुपये इतके शुल्क भरून प्रवेशिका मिळतील. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत खालील ठिकाणी प्रवेशिका मिळतील.

– लोकसत्ता कार्यालय – दुसरा मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१

– रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी

– विद्यालंकार क्लासेस- विद्यालंकार हाऊस , प्लॉट नं. ५६, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर (पूर्व)

’ यासोबत ऑनलाइन प्रवेशिकाही उपलब्ध आहेत.

https://www.townscript.com//e/loksatta-marga-yashacha-mumbai-001230

प्रायोजक

अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई हे या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर आहेत, तर विद्यालंकार आणि एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे हे असोसिएशन पार्टनर असून ‘सपोर्टेड बाय’ पार्टनर्स आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स आहेत. युक्ती, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, लक्ष्य अ‍ॅकॅडमी, अरेना अ‍ॅनिमेशन, आदित्य ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, आयडीईएमआय, मराठा मंदिर बाबासाहेब गावडे इन्स्टिटय़ूटस, रिलायन्स एज्युकेशन, सासमिरा, श्रीनिवासन्स आयआयटी अ‍ॅकॅडमी हे या कार्यशाळेचे ‘पॉवर्ड बाय पार्टनर’ आहेत.