आघाडी सरकारच्या काळात आरेमधील वन्यजीवनाची काळजी घेण्याची भूमिका जाहीर करण्यात आली होती. आता आरेमध्ये मेट्रोच्या यार्डसाठी पर्यावरण परिणाम अहवालात धादांत खोटी माहिती देताना आरेमध्ये वन्यजीवनच नसल्याचे म्हटले आहे. मेट्रोयार्डसाठी २८ एकर जागा लागणार असून यासाठी आरेमधील मोकळा श्वास व वनसंपत्तीचा गळा घोटण्यात येणार असून त्याऐवजी मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे कारशेड उभारा असे आवाहन विख्यात वास्तुविशारद पी. के. दास तसेच वन्यजीवतज्ज्ञ नयन खानोलकर यांनी सांगितले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या विकास आराखडय़ासंदर्भात आयोजित केलेल्या चर्चासत्रात पी. के. दास म्हणाले की, आरेची २२२३ एकर जमीन १९९१ च्या विकास आराखडय़ात ‘ना विकास क्षेत्र’ दाखविण्यात आले होते तेच आता नव्या विकास आराखडय़ात ग्रोथ सेंटर म्हणून दाखविण्याचा उद्योग करण्यात आला आहे. यावेळी झीशान मिर्झा, राजेश सानप व नयन खानोलकर या वन्यजीव प्रेमींनी आरे कॉलनीमध्ये मोठय़ा प्रमाणात वन्य जीव असल्याचे  सप्रमाण दाखवून दिले. दुर्मिळ जातीचे अनेक प्राणी-पक्षी व फुलपाखरे या ठिकाणी असून मेट्रोसाठी बनविण्यात आलेल्या अहवालात आरेमध्ये वन्यजीवन नसल्याची धादांत खोटी माहिती देण्यात आल्याचे नयन खानोलकर म्हणाले. आरेमधील वन्यजीवन टिकलेच पाहिजे अशी भूमिका मांडत आमीर खान यांनी सरकारने विकास आराखडय़ाचे लोकांसमोर सादरीकरण केले पाहिजे असे सांगितले.