आपल्याला अंधारत ठेवून ‘व्हाया कंत्राटदार’ महापौरांशी संधान साधून कोटय़वधी रुपयांचा निधी मिळविणाऱ्या पक्षातील दोन नगरसेवकांवर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे संतप्त झाले आहेत. महापौरांबरोबर मोबाइलवरील संभाषण जगजाहीर करतानाच निधी मिळविणाऱ्या ज्येष्ठ नगरसेवकाकडून स्थायी समितीच्या सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामाही घेतला आहे.
आगामी अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी मिळविताना प्रशासनाने शहरातील विकासकामांसाठी महापौर स्नेहल आंबेकर यांना अतिरिक्त १०० कोटी रुपये दिले होते. शहरातील विकासकामांसाठी निरनिराळ्या पक्षांच्या नगरसेवकांना या निधीचे वाटप करण्यात आले. मात्र या निधीच्या वाटपासाठी आंबेकर यांनी थेट कंत्राटदारांची मदत घेतल्याचा आरोप करीत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर महापौरांबरोबर मोबाइलवर झालेले संभाषण ध्वनिमुद्रित करून देशपांडे यांनी ते जगजाहीर केले.
देशपांडे यांच्याशी बोलताना महापौरांनी टक्केवारीचा उल्लेख केल्याचे आढळले नाही. केवळ कंत्राटदाराचा उल्लेख केल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. या संभाषणादरम्यान दिलीप लांडे यांना किती निधी दिला हे जाणून घेण्याचा प्रयत्न देशपांडे करीत होते. लांडे यांना पाच कोटी रुपये निधी मिळाल्यामुळे संदीप देशपांडे अस्वस्थ झाले आहेत. निवडणुकांनंतर मनसेच्या गटनेतेपदी दिलीप लांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही महिन्यांनी लांडे यांची उचलबांगडी करून  देशपांडे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती.  मात्र निधीवरून वाद पेटलेला असतानाच लांडे यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला आहे.
दरम्यान, अधिक निधी मिळावा यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न देशपांडे करीत असल्याचे उभयतांवरील संभाषणावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या संभाषणाचा आधार घेऊन मनसेला अडचणीत आणण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्या आहेत.

महापौरांच्या विरोधात मोहीम

प्रशासनाने दिलेल्या १०० कोटी रुपये विकासनिधीच्या वाटपावरून सध्या मनसेने महापौरांच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असून महापौरांबरोबर मोबाइलवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांच्या हाती देऊन संदीप देशपांडे यांनी गौप्यस्फोट केला. यामुळे महापौर अडचणीत आल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचेही धाबे दणाणले आहे. शिवसेनेच्या  पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन संदीप देशपांडे यांच्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
कंत्राटदाराने सुचविल्यानुसार मनसेच्या नगरसेविका वैष्णवी सरफरे आणि नगरसेवक लांडे यांना महापौरांनी अनुक्रमे दोन आणि तीन कोटी रुपये निधी देऊ केला आहे. मात्र आमच्या पक्षाला निधी द्यावा, तो आम्ही समसमान वाटून घेऊ, अशी भूमिका घेत  देशपांडे यांनी महापौर  आंबेकर यांना अडचणीत टाकले होते.
संदीप देशपांडे यांना नोटीस
विधिमंडळाच्या आवारात प्रसिद्धीमाध्यमांसमोर महापौरांबरोबर मोबाईलवर झालेल्या संभाषणाबाबत वक्तव्य केल्या प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यावर विधान भवनाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे.  थेट विधिमंडळाच्या आवारात दाखल होऊन देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यामुळे विधान भवनाकडून त्यांच्यावर नोटीस बजावण्यात येणार आहे.