मुलावर संशय; मृतदेहाशेजारी ‘मी हिला कंटाळलोय’ असा रक्ताने लिहिलेला संदेश आढळला

खार पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नी दिपाली (४२) यांची मंगळवारी सांताक्रुज येथील राहत्या घरी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्येनंतर गणोरे यांचा २१ वर्षांचा मुलगा सिद्धांत बेपत्ता आहे. विशेष म्हणजे दिपाली यांच्या मृतदेहाशेजारी टायर्ड ऑफ हर कॅच मी अ‍ॅण्ड हँग (मी हिला कंटाळलो आहे. मला पकडा आणि फासावर द्या) असे वाक्य रक्ताने लिहिलेले आढळले. सिद्धांतचा फोन आणि दिपाली यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू गणोरे यांच्या घरातूनच हस्तगत करण्यात आला. घरातून काही रोकड घेऊन बेपत्ता झाल्याने सिद्धांतवर पोलिसांचा संशय आहे. मात्र मंगळवारी दुपारी खार पोलीस ठाण्यातून पोटदुखीचे कारण सांगून गणोरे तडकाफडकी बाहेर पडल्याची माहिती समोर येताच तपास अधिकाऱ्यांच्या संभ्रमात आणखी भर पडली आहे. तूर्तास सिद्धांतला सुखरूप ताब्यात घेण्याचा प्रयत्न प्राधान्याने सुरू आहे. या प्रकारानंतर तो स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करून घेऊ शकतो, अशी भीती एका पोलीस अधिकाऱ्याने लोकसत्ताकडे व्यक्त केली.

गणोरे खार पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पथकात त्यांचा सहभाग होता. त्याआधी ते तत्कालिन अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या विशेष पथकात कार्यरत होते. तर दिपाली एलएलबी, एलएलएम होत्या. लंडनमध्ये त्यांनी एलएलएमचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तीनेक वर्षांपुर्वी दहावीची परीक्षा दिल्यानंतर सिद्धांत आणि दिपाली यांना गणारेंनी मुंबईत बोलावून घेतले. सांताक्रुज येथील प्रभात कॉलनी, ए. जे. पार्क इमारतीत भाडय़ाच्या घरात गणोरे कुटुंब वास्तव्य करत होते. प्राथमिक तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गणोरे मंगळवारी संध्याकाळपासून दिपाली, सिद्धांत यांना फोन करत होते. मात्र दोघांपैकी कोणीही त्यांचे फोन उचलले नाहीत. रात्री अकराच्या सुमारास घरी आले तेव्हा घर बंद होते. कोणीच फोन उचलत नसल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा बेडरूममध्ये दिपाली रक्ताच्या थोरोळयात जमिनीवर पडलेल्या आढळल्या. त्यांच्या शेजारी इंग्रजीत लिहिलेला संदेशही आढळला. सिद्धांत फोन घरीच ठेवून बेपत्ता होता. गणोरे यांनी हे दृश्य पाहून तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून वर्दी दिली. दिपाली यांना कुपर रुग्णालयात मृत घोषीत केले गेले. तेथेत शवविच्छेदन करण्यात आले. बुधवारी दुपारी नाशिक येथील गावी त्यांचा मृतदेह रवाना करण्यात आला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ८ कडूनही समांतर तपास सुरू आहे.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कचरा देण्यासाठी गणोरे यांनी दार उघडले होते. तसेच खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक रामचंद्र जाधव यानी दिलेल्या माहितीनुसार गणोरे मंगळवारी कर्तव्यावर होते. मात्र दुपारच्या सुमारास त्यांनी पोटदुखीमुळे रुग्ण निवेदन सादर केले. त्यानंतर ते पोलीस ठाण्यातून निघाले. गणोरे पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर दुपारीच घरी परतले की थेट रात्री अकराच्या सुमारास घरी आले, तसेच सिद्धांत कधी बाहेर पडला हे जाणून घेण्यासाठी वाकोला पोलिसांनी ए. जे. पार्कच्या दोन सुरक्षा रक्षकांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण मिळवून गणोरे यांचा दावा चाचपून पाहाण्याचा तसेच घटनाक्रम जुळवून पाहाण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गणोरे सध्या माहिती देण्याच्या मनस्थितीत नाहीत. दिपाली यांचे कार्य आटोपून मुंबईत आल्यावर त्यांच्याकडे चौकशी करून संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला जाईल. घटनेआधी सिद्धांत व दिपाली यांच्यात वाद घडला होता का, याचीही खातरजमा करण्याच्या प्रयत्नात आहोत. सध्या शेजारी, सहकारी, घरी ये-जा असलेले, सिद्धांतचा मीत्र परिवार आदींकडे चौकशी करून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृतदेहाशेजारी रक्ताने लिहिलेला मजकूर हस्ताक्षर तज्ञांच्या मदतीने सिद्धांतचेच आहे का हेही तपासणार आहोत. तसेच दिपाली यांची हत्या नेमकी कधी घडली हे जाणून घेण्याचीही धडपड सुरू आहे. सिद्धांत सापडला की अनेक गोष्टींचा खुलासा होईल.

सिद्धांत.. कसे काय शक्य आहे?

९० टक्क्यांहून जास्त गुण मिळवून इंजिनिअरींगला प्रवेश घेणारा, अधून मधून वडील गणोरेंसोबत पोलीस ठाण्यात किंवा विशेष पथकाच्या कार्यालयात येणारा अबोल व शांत स्वभावाचा सिद्धांत आईच्या हत्येत मुख्य संशयीत असल्याचे ऐकून अनेक पोलीस अधिकाऱ्यांना धक्का बसला. सिद्धांत आणि आईची हत्या, शक्यच नाही, अशी प्रतिक्रिया या प्रत्येक अधिकाऱ्याने लोकसत्ताकडे व्यक्त केली. दोन वष्रे इंजिनिअरींग केल्यानंतर सिद्धांतने वांद्रयाच्या नॅशनल कॉलेजमध्ये एफवाय बीएससीसाठी प्रवेश घेतला होता. मधल्या दोन ते तीन वर्षांमध्ये आई दिपाली अभ्यासासाठी लंडनला असल्याने सिद्धांतचे वडील गणोरेंसोबतचे नाते आणखी दृढ झालेहोते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तो एक्कलकोंडा बनला होता.अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी दिपाली सिद्धांतवर डाफरत. त्याचे समाजमाध्यमांवरील अस्तित्व त्यांना नको होते. त्या आक्रमक स्वभावाच्या होत्या. त्यामुळे अनेकदा चूक नसताना गणोरे यांना नमते घ्यावे लागे. त्यापाश्र्वभुमीवर दिपाली यांच्या स्वभावाला वैतागून सिद्धांतने आईची हत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.