संपकरी डॉक्टरांना उच्च न्यायालयाचे आदेश

डॉक्टरांना कुठल्या परिस्थितीत काम करावे लागते याची आम्हाला जाणीव आहे, पण मागण्यांबाबत राज्य सरकारशी चर्चा करून तोडगा काढता येऊ शकतो, असे स्पष्ट करीत तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी संपकरी डॉक्टरांना दिले. डॉक्टर झाल्यानंतर घेतलेल्या शपथेचीही आठवण करून देताना डॉक्टरांना संपावर जाण्याचा आणि रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार नसल्याचे सुनावले.

न्यायालयाने या वेळी राज्य सरकारलाही धारेवर धरीत डॉक्टरांकडे दुर्लक्ष करू न करण्याचे बजावले. तसेच डॉक्टरांना आजही जर प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागत असेल तर अद्ययावत तंत्रज्ञान आणि विज्ञान काय कामाचे, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली. शिवाय कामावर रुजू होणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई न करण्याचेही न्यायालयाने सरकारला बजावले आहे.

संप वा सामूहिक रजा वा काम बंद आंदोलन करणार नाही, अशी हमी देऊनही संपावर गेलेल्या डॉक्टरांविरोधात अफाक मांदवीय यांनी अवमान याचिका केली आहे. मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने कारवाईचे आदेश दिल्यानंतरही डॉक्टरांना संप मागे घेतलेला नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड्. दत्ता माने यांनी न्यायालयाला सांगितले. त्या वेळी चर्चेद्वारे तोडगा निघू शकतो. पण त्याआधी तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने संपकरी डॉक्टरांना दिले.

तत्पूर्वी, सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयात अतिरिक्त ११०० राज्य सुरक्षारक्षक महामंडळाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाधिवक्त्यांनीही न्यायालयाला दिली. त्याचा पहिला टप्पा म्हणून मुंबईतील रुग्णालयांमध्ये ५ एप्रिलपर्यंत ५००, तर राज्यभरातील रुग्णालयांमध्ये ३० एप्रिलपर्यंत सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील, असे महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सरकारचे म्हणणे मान्य केले. तसेच डॉक्टरांनी कामावर रुजू होऊन सरकारने केलेला दावा खरा आहे की नाही याची शहानिशा करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. शिवाय प्रत्येक १५ दिवसांनी या प्रकरणी सुनावणी घेतली जाईल. त्या वेळी सरकार तसेच डॉक्टरांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली जात आहे की नाही हे तपासून पाहिले जाईल, असेही न्यायालयाने म्हटले.

’कुठल्याही परिस्थितीत काम करू, अशी शपथ प्रत्येक डॉक्टर घेतो. डॉक्टरांना बऱ्याचदा प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागते यात तथ्य असले तरी डॉक्टरी पेशा हा पवित्र मानला जातो. त्यामुळे डॉक्टरांना संपावर जाण्याचा अधिकार नाही. रुग्णांना वाचवणे हे डॉक्टरचे कर्तव्य असून त्यांना वेठीस धरणे नव्हे.

’डॉक्टरांच्या संपामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हतबल होऊन रुग्णालयाबाहेर बसल्याचे चित्र हृदयद्रावक आहे. तुमच्या नातेवाईकाला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले तर तुम्ही काय करणार, असा सवाल उच्च न्यायालयाने संपकरी डॉक्टरांना केला.

 

डॉक्टरांच्या संपाचा तिढा कायम

मुंबई : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केल्यानंतरही गुरुवारी संप मागे घेण्यास राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी नकार दिला आहे. नातेवाईकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या कारणावरून गेले पाच दिवस डॉक्टरांचा संप सुरू आहे. राज्य सरकारकडून लिखित आणि ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे कारण पुढे करीत डॉक्टरांनी गुरुवारीही कामबंद आंदोलन सुरुच ठेवले. त्यातच  इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए), असोसिएट ऑफ मेडिकल कन्सलटंट (एएमसी), मेडिकल टिचर्स असोसिएशन यांनीही पाठिंबा दिल्याने संपाला बळकटी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात सरकारी किंवा पालिका रुग्णालयातीलच नव्हे तर खासगी वैद्यकीय सेवेवरही संपाचा विपरित परिणाम झाला. या आंदोलनात १ लाखाहून अधिक डॉक्टर सहभागी झाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांत ५३ डॉक्टरांवर हल्ले करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी गेली अनेक वर्षे राज्य सरकारकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे यंदा सरकारने लेखी आश्नासन द्यावे अशी मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे. गेले पाच दिवस पालिकेच्या रुग्णालयाचे बाह्य़विभाग बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला. न्यायालयाच्या आदेशानंतरही रुग्णालयात रुजू न होणाऱ्या निवासी डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आल्यान आहेत.

अनेक निवासी डॉक्टरांना वसतिगृह रिकामी करण्यासंदर्भातही नोटीस बजावण्यात आली आहे. या आंदोलनाला म्युनिसिपल मजदूर युनियन या संघटनेनेही पाठिंबा दर्शविला आहे. डॉक्टरांबरोबर परिचारिका व रुग्णालय कर्मचाऱ्यांनाही पालिका रुग्णालयात त्रास सहन करावा लागत आहे.

 

मुलीचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाची नातेवाईकांकडून तोडफोड

औरंगाबाद : उपचारानंतरही सात महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा राग असल्याने कन्नड येथील लक्ष्मी हॉस्पिटलवर १० ते १२ जणांनी गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हल्ला करून तोडफोड केली.

सात महिन्यांच्या अमीन सबीज बेग या मुलीच्या डोक्याला मार लागला होता. दोन दिवसांपूर्वी तिच्यावर लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते. अचानक तिची प्रकृती बिघडल्यामुळे आज तिला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मात्र, प्रवासादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त कन्नडमध्ये नातेवाईकांना कळाल्यानंतर त्यांनी रुग्णालय व सोबतच्या औषधी दुकानाची तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.