मुंबई महापालिकेच्या भांडुपमधील पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेच्या मीनाक्षी पाटील यांचा ४ हजार ७९२ मतांनी पराभव केला. भांडुप पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्यामुळे भांडुपमध्ये भाजपचा उमेदवार बाजी मारणार की शिवसेना उमेदवार विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. मात्र, भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्य लढत होती.

भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांनी ११ हजार १२९ मते मिळवत विजयी मिळवला. शिवसेनेच्या मीनाक्षी पाटील यांना ६ हजार ३३७ मते मिळाली. भाजपच्या जागृती पाटील या ४ हजार ७९२ मतांनी विजयी झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप यांच्यातील नगरसेवकांमध्ये फारच कमी अंतर आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी भांडुपच्या पोटनिवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली होती. अखेर भाजपने याठिकाणी बाजी मारली आहे. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील यांचा विजयानंतर महापालिकेतील समीकरणे बदलणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. सध्याच्या घडीला शिवसेना ८८, भाजप दोन अपक्षासह ८५, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९, मनसे, ७ , समाजवादी पार्टी ६ आणि एमआयएमचे दोन नगरसेवक आहेत.