टीव्हीवरून जाहिरातीद्वारे हृदयरोग, मधुमेह बरा करण्याचा दावा करणारा स्वयंघोषित डॉक्टर मुनीर खान याला अन्न व औषध प्रशासनाने वर्सोवा पोलीस ठाण्याच्या मदतीने कारवाई करून अटक केली. तो ज्या औषधांचा दावा करत होता ते ‘बॉडी रिव्हायवल’ हे औषध मिथ्याछाप व अप्रमाण असल्याचे चाचणीत सिद्ध झाले आहे. त्याला ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मुनीर खान सध्या विविध टीव्ही वाहिन्यांवर आपल्या जाहिराती करत होता. बॉडी रिव्हायवल हे औषध घेतल्याने हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी विकार बरे होत असल्याचा दावा तो करत होता. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तोतया ग्राहक त्याच्या वर्सोवा येथील क्लिनिकमध्ये पाठवले. तेथे बॉडी रिव्हायवल या औषधाची १०० मिली ग्रॅम बाटली १५ हजार रुपयांना विकली जात असल्याचे लक्षात आले. अन्न व औषध प्रशासनाने त्याच्या क्लिनिकमधील दोन हजारांहून अधिक बाटल्या प्रतिबंधित केल्या आणि त्यातील औषधाचे नमुने औषध नियंत्रक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या बाटल्यांची किंमत सुमारे १३ कोटी रुपयांहून अधिक होती. चाचणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. त्यात औषधाच्या लेबलमध्ये नमूद केल्याप्रमाणे वेखंडचा अंतर्भाव नव्हता. तसेच हे औषध बनावट मिथ्याछाप व अप्रमाण असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे पुन्हा खान याच्यावर औषधे व सौंदर्यप्रसाधन कायदा, तसेच औषधे व जादूटोणा आक्षेपार्ह जाहिराती, महाराष्ट्र मेडिकल पॅ्रक्टिशनर्स कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.