ऑनलाइन मूल्यांकनामुळे पदवीचे निकाल रखडल्याचा परिणाम

संगणकाधारित मूल्यांकनामुळे (ऑनलाइन) पदवीचे निकाल रखडल्याने मुंबई विद्यापीठाने आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर टाकली असली तरी मुंबईतील अनेक नामांकित स्वायत्त संस्थांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याने येथील प्रवेशांची दारे विद्यार्थ्यांना बंद झाली आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या निकाल रखडपट्टीमुळे बाहेरील शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांची प्रवेशाची संधी केव्हाचीच हुकली आहे, परंतु एकेकाळी विद्यापीठाच्या पंखाखाली असलेली, मात्र आता स्वायत्त असलेल्या संस्थांमध्येही विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संधी राहिलेल्या नाहीत. त्यामुळे आता फक्त विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविणारी मोजकी संलग्नित महाविद्यालये यांच्यावरच विद्यार्थ्यांची भिस्त असेल.

विद्यापीठाच्या लांबलेल्या निकालामुळे ऑगस्ट महिना संपत आला तरी पदवीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. काही शाखांचे निकाल जाहीर झाले आहेत, परंतु त्यातही काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव असल्याने त्यांना विद्यापीठाच्या चकरा माराव्या लागत आहेत. निकालाच्या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठावर आता पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने सोमवारी काढले, परंतु स्वायत्त संस्थांमध्ये शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या आदेशानंतरही काही हाती लागण्याची शक्यता नाही. कारण मुंबईतील बहुतांश स्वायत्त संस्थांचे प्रवेश जुलै महिन्यातच पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आता निकाल जाहीर झाले तरी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र या संस्थांची दारे बंद राहणार आहेत.

झेवियर्स महाविद्यालयाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन वर्ग महिनाभरापूर्वीच सुरू झाले आहेत. काही दिवसांतच त्यांची पहिली अंतर्गत चाचणी परीक्षा आहे. केरळ, राजस्थान, दिल्ली, ईशान्येकडील राज्ये असे भारतभरातून विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी धडपडत असतात. भूगर्भशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र हे दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम झेवियर्स वगळता मुंबईतील मोजक्याच महाविद्यालयांमध्ये शिकवला जातो. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्नात असतात. तसेच या अभ्यासक्रमांसाठी सुमारे ३० जागा असतात.

तेव्हा मुंबई विद्यापीठातील या विषयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही या प्रवेशावर पाणी सोडावे लागले आहे. ‘‘विद्यापीठाचा बराचसा अभ्यासक्रम पुढे गेला आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांना झेवियर्समध्ये प्रवेश मिळाला तरी त्यांना अभ्यासक्रमामध्ये सामावून घेणे कठीण आहे. तसेच जागाही पूर्णपणे भरलेल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची या वर्षांची संधी हुकली आहे,’’ असे झेवियर्स महाविद्यालयाचे प्राध्यापक अवकाश जाधव यांनी सांगितले आहे.

के. जे. सोमय्याचेही पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश जुलैमध्ये पूर्ण झालेले आहेत. तेव्हा मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आमच्याकडे जागाच शिल्लक नाहीत. तसेच विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होऊनही २० दिवस उलटलेत.

 – सुधा व्यास, प्राचार्या के. जे. सोमय्या 

 

मुंबई विद्यापीठाच्या निकालांची वाट पाहण्यामध्ये आधीच आम्ही बराच वेळ घालविला आहे. आता ऑगस्ट महिना संपत आला तरी यांचे निकाल अजून जाहीरच होत आहेत. सप्टेंबरमध्ये तरी आम्हाला वर्ग सुरू करावे लागतील. तेव्हा येत्या दोन दिवसांत पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणार आहोत.

 – सुहास पेडणेकर, प्राचार्य रुईया महाविद्यालय