संख्याबळावर विधान परिषदेचे सभापतीपद मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेत राष्ट्रवादीने काँग्रेसकडील हे पद काढून घेण्यावर भर दिला आहे. तसेच विरोधी पक्षनेतेपदावरही राष्ट्रवादीचा डोळा आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे २८ तर काँग्रेसचे २१ आमदार आहेत. काँग्रेसला धडा शिकविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीने सभापतीपादवर दावा केला आहे. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीच्या वतीने सभापतीपदावर दावा केला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.