टोलविरोधी आंदोलन शिगेला पोहचले असताना राज्यातील टोलवाटा मात्र वाढू लागल्या असून, शीव-पनवेल महामार्गाला ‘एक्सप्रेस’चे वलय मिळवून देण्याच्या नादात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वारावर आता आणखी एक टोलनाका उभारण्यात येत आहे. नवी मुंबईत खारघरच्या पुढे कामोठे-कळंबोलीच्या नाक्यावर हा  नवा टोलनाका बांधण्याचे काम सुरू असून, पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोलीच्या प्रवासासाठीही तेथे टोल भरणे अपरिहार्य ठरणार आहे. मुंबई-पुणे हा प्रवास एक्सप्रेस मार्गाने करावयाचा असेल, तर वाशीसह आणखी दोन ठिकाणी टोल भरावा लागतो. ठाणे तसेच परिसरातील प्रवाशांच्या माथ्यावर पुणे प्रवासासाठी ऐरोली टोलनाक्याचे ओझे आहेच. अशात हा नवा टोलनाका मुंबई-पुणे प्रवास आणखी महाग करणार आहे. विशेष म्हणजे, मुंबईहून कोकणात जाण्यासाठी शीव-पनवेल महामार्गाचा वापर केल्यासदेखील येथे टोल भरावा लागेल.
वाशी टोलनाक्यांपासून अवघ्या १३ किलोमीटर अंतरावर हा टोलनाका असेल. मुंबईतील भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) ते कळंबोली जंक्शन अशा २५ किलोमीटर अंतरात कॉक्रिटचा हा दहा पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. त्याचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सुमारे १५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे बीएआरसी ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हे अंतर अवघ्या २५ मिनिटांत कापता येईल, असा दावा केला जात आहे. मुंबई-पुणे-गोवा अशा महत्वाच्या महामार्गाच्या दिशेने जाण्यासाठी शीव-पनवेल हा महत्वाचा रस्ता आहे. याचे काम ‘सायन-पनवेल टोलवेज प्रा. लिमीटेड’ या कंपनीस देण्यात आले आहे.
वर्दळीचा महामार्ग
शीव-पनवेल महामार्गावर दररोज सुमारे सव्वा लाख वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे बीएआरसी ते कळंबोली जंक्शनदरम्यान दोन्ही बाजूकडून पाच पदरी कॉक्रिटचा रस्ता उभारला जाणार आहे. या प्रकल्पात कामोठे, उरण फाटा तसेच सानपाडा स्थानकासमोर तीन नवे उड्डाणपुल उभारण्यात येणार असून, मानखुर्द तसेच तळोजा येथील एकेरी उड्डाणपूलाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर याची उभारणी होत असली, तरी या मार्गाच्या दोन्ही बाजूस नागरी वसाहती आहेत. त्यामुळे नव्या प्रकल्पात तब्बल १२ भुयारी मार्गाची उभारणी केली जाणार आहे. बेलापूर िखडीची रुंदीही या प्रकल्पात वाढविली जात असून तेथे दोन पदरी डांबरी सेवारस्ता उभारला जात आहे.