सामान्यत: माणसाच्या तोंडात ३२ दात असतात. मात्र, मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका मुलाच्या तोंडात २३२ दात असल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून २३२ दात काढले. अशाप्रकारे एखाद्या एखाद्याच्या जबड्यातून २३२ दात काढण्याची ही जगातील पहिलीच घटना ठरली असल्याचे समजते.
बुलढाण्यात राहणारा आशिष गवई हा दहावीत शिकणारा विद्यार्थी चेहऱ्याचा काही भाग सुजल्याची समस्या घेऊन मुंबईतील जे.जे. रूग्णालयात उपचारासाठी आला होता. त्यावेळी आशिषच्या जबडय़ाच्या खालच्या बाजूला सूज दिसत होती. त्याची तपासणी केल्यावर उजव्या बाजूची खालची अक्कलदाढ आणि त्याच्या पुढची दाढ त्याला नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. मग हिरडीच्या आतल्या बाजूला नक्की काय झाले आहे हे पाहण्यासाठी एक्सरे काढण्यात आला. त्यावेळी, आशिषच्या हिरडीच्या आतल्या बाजूस अनेक दात असल्याचे समोर आले. हिरडीच्या आतल्या बाजूच्या आणि तोंडातील दातांची संख्या मिळून २३२ इतकी भरल्याचे या तपासणीतून स्पष्ट झाले. त्यानंतर डॉ. सुनंदा धिवरे आणि डॉ. थोराडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आशिषवर शस्त्रक्रिया करून अतिरिक्त दात काढून टाकण्यात आले आहेत. ही शस्त्रक्रिया तब्बल साडेसहा तास सुरू होती. ही घटना म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार मानला जात आहे.