नवी मुंबई आणि औरंगाबादमधील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपली असून दुपारी ३.३० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार
नवी मुंबईत ४२ तर औरंगाबादमध्ये ४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 
दोन्ही ठीकाणच्या काही तुरळक घटना वगळता मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. यापैकी सकाळच्या वेळात नवी मुंबईतील रबाळे येथे १० जण बोगस मतदान करण्यासाठी आले होते. मात्र, हा प्रकार निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर या सगळ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. तर दुपारच्या वेळी येथील गोठीवली प्रभाग क्र. २४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघाजणांना ताब्यात घेण्यात आले. तर औरंगाबादमध्ये सुराणा नगर आणि गणेश कॉलनी येथे दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलीसांनी याप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
सकाळी ७.३० वाजता दोन्ही ठिकाणी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबलचक रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. विशेष म्हणजे सुट्टीचा दिवस नसूनही मतदार जाणीवपूर्वक आपली जबाबदारी पार पाडताना दिसले. मात्र, दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग मंदावला. दुपारी १.३० वाजेपर्यंत नवी मुंबईत ३२ तर औरंगाबादमध्ये ३७ टक्के मतदानाची नोंद  झाली होती. औरंगाबाद येथे सकाळच्या वेळेत ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली आहे. औरंगाबादमधील तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहचला असल्यामुळे दुपारच्या कडकडीत उन्हात बाहेर पडावे लागू नये म्हणून मतदार सकाळच्याच वेळेत मतदान आटपून घेताना दिसत होते. अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनीही सकाळीच मतदान करणे पसंत केले.

नवी मुंबई पालिकेच्या १११ प्रभागासाठी ५६८ उमेदवार आपलं नशिब आजमवणार आहेत. यासाठी एकुण ८,१५,०६७ मतदार आहेत. एकूण ७७४ मतदान केंद्र आहेत. त्यामधील चार मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. तर, औरंगाबाद महापालिकेत ११३ प्रभागासाठी एकुण ९०७ उमेदवार आपलं नशीब आजमवणार आहेत. यासाठी एकुण ८ लाख १६ हजार २२० मतदार आहेत. एकूण ६७१ मतदान केंद्र आहेत. त्यातले ११ संवेदनशील तर ३८ पोलिसांसाठी महत्वाचे आहेत.

नवी मुंबईत गणेश नाईक, औरंगाबादमध्ये शिवसेना, भोकरमध्ये अशोक चव्हाण या साऱ्यांची प्रतिष्ठा होणाऱ्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत पणाला लागली आहे. सत्तेत आल्यानंतर होणाऱ्या दोन महापालिका आणि सात नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून देण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढेही आहे. 

नवी मुंबई आणि औरंगाबाद या दोन महानगरपालिका, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, भोकर, वाडी, राजगुरूनगर, वरणगाव आणि मोवाड या सात नगरपालिकांसाठी बुधवारी मतदान होत आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या एकहाती सत्तेला शिवसेना-भाजपने आव्हान दिले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महापालिकेचा गड राखण्याचे नाईक यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. महापालिकेची सत्ता गमवावी लागल्यास गणेश नाईक यांच्या नेतृत्वाची अधोगती सुरू झाली, असा अर्थ काढला जाईल. आतापर्यंत ‘नवी मुंबईत गणेश नाईक बोले, यंत्रणा हाले’ असे चित्र होते. नाईकांची सद्दी संपविण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकरमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता या विधानसभेत निवडून आल्या आहेत. तसेच गेल्या वेळी स्वत: चव्हाण याच मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे.
अंबरनाथमध्ये शिवसेना तर कुळगाव-बदलापूरमध्ये भाजपने जोर लावला आहे. बदलापूरमध्ये जुने कार्यकर्ते तसेच जुने नेते आणि निवडणुकीच्या तोंडावर पक्षात दाखल झालेले आमदार किसन कथोरे यांच्यात सूर जुळू शकलेला नाही.

मतदारांमधील निरुत्साहामुळे उमेदवार चिंतेत