कालनिर्णय

कालनिर्णयचा दिवाळी अंक विविध विषयांनी परिपूर्ण आहे. ‘वल्लभभाई धर्मनिरपेक्ष पण कठोर’ या विशेष लेखात नरेंद्र चपळगावकर यांनी वल्लभभाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. १९१४ च्या पहिल्या महायुद्धात भारताने ब्रिटिशांना मदत केली, मात्र या त्यागाची जाण त्यांनी ठेवली नाही. या विस्मृतीत गेलेल्या इतिहासावर डॉ. अरविंद गणाचारी यांनी प्रकाश टाकला आहे. टेलिफोनच्या शोधाची चित्तरकथा रंजक आहे. मराठी सिनेमांचे अर्थशास्त्र या विषयावर संजय छाब्रिया यांचा अभ्यासपूर्ण लेख आहे. इजिप्तची जीवनदायीनी असलेल्या नाईल नदीची शोधयात्रा तसेच मार्क्‍स, श्रद्धा-धर्म आणि संशय हा राजू परुळेकर यांनी साम्यवादी विचारांचा वेध घेतला आहे. एकूणच या अंकात बदलत्या काळाचे भान ठेवून विविध विषयांचा मागोवा घेण्यात आला आहे.  – संपादक -जयराज साळगावकरकिंमत – १२०  रुपये.

 

पद्मगंधा

प्रत्येक अंक विशेष आणि वैशिष्टय़पूर्ण करून वाङ्मयीन प्रतिष्ठा मिळविणाऱ्या पद्मगंधाचा दिवाळी अंक यंदाही विविध लेखांमुळे समृद्ध झाला आहे. अंकाचा प्रारंभ डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अप्रकाशित लेखाने करण्यात आला आहे. शोध आबे फारीयाचा हा दीर्घ लेख अतिशय रंजक आणि वाचकांना खेळवून ठेवणारा आहे. गोव्यातून सातासमुद्रापलीकडे जाऊन शिक्षण, क्रांतीत सहभाग घेणाऱ्या फारीयाने विज्ञानदृष्टी ठेवून केलेली नवी वैज्ञानिक चिकित्सा थक्क करणारी आहे. जयप्रकाश सावंत यांचा लेखक-प्रकाशक संबंधावर हरमान हेसेवरील लेख, पद्मजा घोरपडे यांचा सिनेमाविषयक ललित लेख, प्रवीण दवणे यांचा पाडगावकरांचे स्मरण करून देणारा लेख अंकामध्ये असल्याने हा अंक समृद्ध झाला आहे. – संपादक – अरुण जाखडे, किंमत –  २०० रुपये

 

उद्योजक

समाजाची मानसिकता उद्योजकीय घडविण्याचा वसा घेतलेल्या ‘उद्योजक’ या मासिकाने आपली आगळीवेगळी परंपरा जपत या वर्षीही दिवाळी अंकात उद्योजकतेला चालना देणाऱ्या विषयांची मांडणी केली आहे. आजच्या युगात उद्योजकीय ऊर्जेची गरज का आहे, याविषयी प्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. कडवेकर यांनी आपले मौलिक विचार मांडले आहेत. महासत्ता होण्यामध्ये तरुणाईचे योगदान व त्यासाठी काय करावे याविषयी डॉ. जर्रा काझी यांचे मार्गदर्शन, शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाच्या गरजेविषयी डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. रशिंगकर यांनी केएफसीच्या यशाची गुपिते तसेच पद्माकर देशपांडे यांनी स्टार्टअपचा अर्थ, जीएसटी, कररचनेविषयी योग्य माहिती दिल्याने अंक वाचनीय झाला आहे.  – संपादक – पी. पी. देशमुख, किंमत – १५० रुपये

 

स्वेद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्याभोवती घडणाऱ्या सर्वच मंगल-अमंगलाची नोंद घेणे आवश्यक असते. त्याच भावनेतून वाचकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न या अंकातून संपादकांनी केला आहे. कथा विभागातील कॅन्टीन, सावधान शुभमंगल, विरार लोकल, सूर्यग्रहण या अनुक्रमे विलास गावडे, सुजाता फडके, मॅटिल्डा डिसिल्वा आणि कल्याणी बोन्नुरवार यांच्या कथा वाचनीय आहेत. तर सफर विभागातील अनुपम्य कासचा.., अरण्य वाचन हे लेख वाचक पसंतीचेच म्हणावे लागतील. आठवणीतले दिवस, बेबंद नोकरशाही,  पोस्टकार्ड कथा, पेरते होऊ या, लोकल कथा या स्फुट विभागातील विषयांनाही वाचकांची पसंती मिळाली आहे. कवितांगणातील कवितांचे विषयही वाचकांना मेजवानीचे आहेत.  – संपादक – संदीप ल. राऊत, किंमत-१२०